वृत्तसंस्था / नवी दिल्ली
येत्या ऑगस्ट महिन्यात अझहरबेजानमधील बाकु येथे होणाऱ्या विश्व रायफल आणि पिस्तूल नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी अखिल भारतीय रायफल संघटनेने भारतीय नेमबाज संघाची घोषणा केली आहे.
बाकुमधील स्पर्धेनंतर सप्टेंबर महिन्यात हेंगझोयु आशियाई क्रीडा स्पर्धा होणार असून या स्पर्धेसाठी यापूर्वीच भारतीय शॉटगन नेमबाज संघ जाहीर करण्यात आला आहे. बाकुमध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी एकूण 22 नेमबाजांची निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पॅरीस ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी 32 नेमबाज तर हेंगझोयु आशियाई स्पर्धेसाठी 21 नेमबाजांची निवड केली आहे. पुरुषांच्या 10 मी. एअर रायफल विश्व चॅम्पियन रुद्रांक्ष पाटील याचा आशियाई तसेच पॅरीस ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. हेंगझोयु येथे होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी महिलांच्या एअर रायफल नेमबाज संघामध्ये तिलोतमा सेनच्या जागी आता आशी चोक्सीचा समावेश करण्यात आला आहे.