वृत्तसंस्था / कोलंबो
श्रीलंकेतील एका न्यायालयाने एका भारतीय नागरीकाला मॅच फिक्सिंग प्रकरणी सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. योगी पटेल असे या आरोपीचे नाव आहे. श्रीलंकेच्या क्रिकेट निवड समितीचे अध्यक्ष उपुल थरंगा यांनी सादर पेलेल्या तक्रारीनुसार पटेल याच्यावर अभियोग सादर करण्यात आला होता. श्रीलंकेतील कँडी येथील लीजेंडस् लीग टी 20 मालिकेत सामने फिक्स करण्यासाठी या आरोपीने ऑफर दिली होती, असे त्याच्या विरोधातील तक्रारीत नमूद आहे.
ही स्पर्धा गेल्या वर्षी मार्च मध्ये आयोजित करण्यात आली होती. पटेल याच्या विरोधात त्याच्या अनुपस्थितीत हा अभियोग चालविण्यात आला होता. त्याला मार्च मध्ये अटक करण्यात आली होती. तथापि, त्याची जामीनावर सुटका करण्यात आली होती. त्यानंतर तो श्रीलंकेतून पळून गेला होता. त्याच्या विरोधात श्रीलंकेतील न्यायालयाने वॉरंट लागू केले होते. श्रीलंकेच्या गुप्तचर यंत्रणेने त्याला शोधण्याचा प्रयत्न चालविला होता. तथापि, तो आजवर सापडलेला नाही.
श्रीलंकेतील कायद्यानुसार शिक्षा
श्रीलंकेत 2019 मध्ये क्रीडा क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या विरोधात कायदा करण्यात आला आहे. या कायद्यानुसार मॅच फिक्सिंगच्या गुन्ह्यासाठी 10 वर्षांच्या सश्रम कारावासाची, तसेच 5 लाख 50 हजार अमेरिकन डॉलर्सचा दंडाची शिक्षा ठोठावण्यात येते. पटेल याला या प्रकरणात सश्रम कारावासाच्या शिक्षेसमवेत 8 कोटी 50 लाख श्रीलंका रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात थरंगा यांची मानहानी केल्यामुळे त्याला 20 लाख श्रीलंका रुपयांचा दंडही करण्यात आला आहे. श्रीलंकेतील हे शिक्षा होण्याचे प्रथम प्रकरण आहे.









