आयनॉक्स परिसरात तीन दिवस आयोजन : कार्यशाळा, वैज्ञानिक चर्चा, प्रदर्शनांची मेजवानी
प्रतिनिधी /पणजी
विज्ञानात रुची दाखवणाऱया विद्यार्थ्यांबरोबरच सर्वसामान्य जनतेमध्ये वैज्ञानिक ज्ञान आणि माहिती पोहोचविण्याच्या दृष्टीने महत्वाचे माध्यम असलेला भारतीय विज्ञान चित्रपट महोत्सव 26 ते 28 दरम्यान पणजीत आयनॉक्स परिसरात होणार आहे.
विग्नज्ञान तंत्रज्ञान खाते, गोवा विद्यापीठ, राष्ट्रीय समुद्रसंशोधन संस्था (एनआयओ) यांच्या संयुक्त विद्यमाने गोवा विज्ञान परिषदेतर्फे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून तिन्ही दिवस विविध कार्यशाळा, विज्ञान आधारित चित्रपट-लघुपट प्रदर्शन, ’तुमचा शास्त्रज्ञ ओळखा’ यासारखे कार्यक्रम-उपक्रम होणार आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते 26 रोजी महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत विज्ञान परिषदेचे अध्यक्ष सुहास गोडसे यांनी ही माहिती दिली. त्यावेळी गोवा करमणूक संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा विज्ञान तंत्रज्ञान सचिव डॉ. तारीक थॉमस, गोवा विद्यापीठाचे उपकुलगुरू प्रो. हरिलाल मेनन आणि एनआयओचे डॉ. सुंदरेया आदींची उपस्थिती होती.
महोत्सवाचे आयोजन 2016 पासून
2016 पासून अशाप्रकारे विज्ञान चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. परंतु कोरोनामुळे गतवर्षी हा महोत्सव आयोजित करणे शक्य झाले नाही. यंदा त्याचे मोठय़ा प्रमाणात आयोजन करण्यात येत असून गोव्यासह शेजारील राज्याच्या सीमाभागातील विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेण्यात येणार आहे.
महोत्सवाची महिनाभर जागृताr
प्रत्यक्ष महोत्सवपूर्व तयारीचा भाग म्हणून विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्याच्या हेतूने परिषदेतर्फे दि. 15 मार्च ते 15 एप्रिल दरम्यान विविध तज्ञांसह राज्यातील सुमारे 52 विद्यालयांना भेटी देण्यात आल्या. त्या दरम्यान विज्ञान चित्रपट निर्मिती कार्यशाळा घेण्यात आली. त्यात 55 जणांनी सहभाग घेतला. त्यांच्यासाठी आता लघुचित्रपट निर्मिती स्पर्धा आयोजित करण्यात आली असून त्यातील विजेत्यांना महोत्सवादरम्यान बक्षीस वितरण करण्यात येईल.
’वैज्ञानिक विद्यार्थी गाव’ उपक्रम
ग्रामीण भागातील निवडक 160 विद्यार्थ्यांसाठी ’वैज्ञानिक विद्यार्थी गाव’ हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम प्रथमच या महोत्सवात आयोजित करण्यात येणार आहे. त्याशिवाय पुढील संशोधन नवनिर्मितीच्या दृष्टीने डिझाईन तयार करण्यातील नव्या कल्पना सूचविण्यासाठी विशेष कार्यशाळा, तसेच विज्ञान शिक्षकांसाठी कार्यशाळा, शिक्षकांसाठी रोबोटिक्स कार्यशाळा, वैज्ञानिक प्रदर्शन, आदी कार्यक्रम होणार आहे.
या महोत्सवानिमित्त तिन्ही दिवस देशातील अनेक नामवंत वैज्ञानिक उपस्थित राहणार असून विद्यार्थ्यांना त्यांच्याशी मुक्तपणे संवाद साधता येणार आहे.
गो-विज्ञान प्रदर्शन ठरणार वैशिष्टय़पूर्ण
गो-विज्ञान प्रदर्शनात गाईचे शेण आणि गोमुत्रापासून विकसित करण्यात आलेल्या अनेक जैव वैविध्यपूर्ण वस्तू मांडण्यात येणार आहेत. त्यात खास करून निसर्गाशी सहज एकरूप होणाऱया गणेशमूर्ती प्रदर्शित करण्यात येणार आहेत. या मूर्तींमुळे ’प्लास्टर ऑफ पॅरिसच्या’ मूर्तींचे वाढते प्रस्थ रोखण्यात मोठा हातभार लागेल अशी अपेक्षा आहे. त्याशिवाय अशाचप्रकारच्या अनेक नाविन्यपूर्ण संशोधनातीत वस्तूही प्रदर्शित करण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.









