वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप, बुडापेस्ट : भारतीय संघ प्रथमच अंतिम फेरीत : आज जेतेपदासाठी धावणार
वृत्तसंस्था/ बुडापेस्ट
हंगेरीतील बुडापेस्ट येथे सुरु असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतीय खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारताच्या पुरुष संघाने या चॅम्पियनशिपच्या 4×400 मीटर रिले शर्यतीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, स्पर्धेच्या इतिहासात भारतीय संघ प्रथमच अंतिम फेरीत पोहोचला आहे. रविवारी रात्री उशिरा रिलेची फायनल रंगणार असून भारतीय संघाच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. या शानदार कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय रिले संघाचे विशेष अभिनंदन केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत आज होणाऱ्या फायनलसाठी संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.
मोहम्मद अनास याहिया, अमोज जेकब, मोहम्मद अजमल वरियाथोडी आणि राजेश रमेश या भारतीय चौकडीने हे संस्मरणीय यश मिळवले. भारतीय पुरुष संघाने 4×400 मीटर रिले शर्यतीत 2:59.05 अशी वेळ नोंदवून आशियाई विक्रम मोडला. यापूर्वीचा विक्रम जपानच्या खेळाडूंच्या नावावर होता. त्यांनी (2 मिनिटे 59.51 सेकंद) अशी वेळ नोंदवली होती. यापूर्वी, भारताचा विक्रम 3 मिनिटे 00.25 सेकंदांचा होता, जो 2020 ऑलिम्पिकमध्ये त्याच भारतीय संघाने (मोहम्मद अजमल, राजेश रमेश, अमोज जेकब आणि मोहम्मद अनास) केला होता. त्यानंतर भारतीय संघ अंतिम फेरीला मुकला होता.
भारतीय संघाची जबरदस्त कामगिरी
अव्वल स्थानावर राहून अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या अमेरिकेविरुद्ध भारताला हीट-1 मध्ये ठेवण्यात आले होते. अमेरिकन खेळाडूंनी ही शर्यत दोन मिनिटे 58.47 सेकंदात पूर्ण केली. भारत शर्यतीत ग्रेट ब्रिटन आणि बोत्सवानासारख्या संघांपेक्षा पुढे होता, ही कामगिरी आश्चर्यकारक होती. जमैका (2:59:82 सेकंद), फ्रान्स (3:00:05 से.) आणि इटली (3:00:14 से.) आणि नेदरलँड (3:00:23 से.) यांनी हीट-2 मधून अंतिम फेरीत प्रवेश केला.
संथ सुरुवातीनंतर दुसरे स्थान
या रिले शर्यतीत भारताकडून संथ सुरुवात झाली होती. मोहम्मद अनासने संघाला संथ सुरुवात करून दिली. पहिल्या फेरीनंतर भारत सहाव्या क्रमांकावर होता. यानंतर अमोज जेकबने संघाचा वेग वाढवला आणि भारताला दुसऱ्या स्थानावर नेले. यानंतर मोहम्मद अजमल आणि राजेश रमेश यांनी आपल्या उत्कृष्ट वेगाच्या जोरावर शेवटच्या दोन टप्प्यात भारताला अंतिम फेरीसाठी पात्र ठरवले. अशाप्रकारे इतिहास रचत भारतीय रिले संघाने प्रथमच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.









