वृत्तसंस्था / चेन्नई
येथे झालेल्या 94 व्या अखिल भारतीय एमसीसी – मुरुगप्पा सुवर्ण चषक हॉकी स्पर्धेचे अजिंक्यपद भारतीय रेल्वे हॉकी संघाने पटकाविले. या स्पर्धेतील झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय रेल्वे संघाने कर्नाटकाचा 5-2 अशा गोलफरकाने पराभव केला.
या अंतिम सामन्यात दुसऱ्या मिनिटालाच प्रताप लाक्राने पेनल्टी कॉर्नवर रेल्वेचे खाते उघडले. 17 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नवर त्रिशुल गणपतीने कर्नाटकाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर भारतीय रेल्वे संघातील प्रताप लाक्राने 24 व्या आणि 29 व्या मिनिटाला असे दोन गोल पेनल्टी कॉर्नवर नोंदविले. मध्यांतरापर्यंत रेल्वे संघाने कर्नाटकावर 3-1 अशी आघाडी घेतली होती. सामन्याच्या उत्तरार्धात भारतीय रेल्वे संघाने आणखी दोन मैदानी गोल केले. अजित पांडेने रेल्वे संघाला 5-1 अशी आघाडी मिळवून दिली होती. पांडेने 36 व्या आणि 42 व्या मिनिटाला हे गोल नोंदविले. सामना संपण्यास 8 मिनिटे बाकी असताना कर्नाटकाचा दुसरा गोल चेतनने नोंदविला.
या सामन्यानंतर आयोजिलेल्या बक्षीस वितरण समारंभाला केंद्रीय क्रीडा युवजन खात्याचे राज्य मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या हस्ते विजेत्या भारतीय रेल्वे हॉकी संघाला आकर्षक चषक व 7 लाख रुपयांचे रोख बक्षीस त्याचप्रमाणे उपविजेत्या कर्नाटक संघाला चषक व 5 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले.









