वृत्तसंस्था /जोहान्सबर्ग
भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा येत्या 10 डिसेंबरपासून टी-20 मालिकेने सुरु होत आहे. भारत व दक्षिण आफ्रिका संघात 3 सामन्यांची टी-20, 3 वनडे आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यासाठी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात अधिकतर युवा खेळाडूंचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेत खेळाडूंचे जंगी स्वागत केले गेले. बीसीसीआयने नुकताच यादरम्यानचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओत सर्व खेळाडूंचा प्रवास दाखवण्यात आला आहे. सर्व खेळाडू प्रवासादरम्यान मस्ती करताना दिसत आहेत. जेव्हा भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला पोहोचला, तेव्हा पाऊसही पडत होता. यादरम्यान खेळाडू आपल्या डोक्यावर बॅग घेऊन धावताना दिसले. विमानतळावर उतरल्यानंतर बसमध्ये बसण्यासाठी खेळाडू स्वत:ला पावसात भिजण्यापासून वाचवण्यासाठी डोक्यावर बॅग घेऊन धावत होते. चाहत्यांनीही या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात लाईक केले आहे. दरम्यान, या दौऱ्याची सुरुवात 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेने होणार आहे. टी-20 मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे. अशात सूर्या आपल्या नेतृत्वाखाली या मालिकेत काय कमाल करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.









