वृत्तसंस्था/ बार्बाडोस
विंडीजविरुद्ध होणाऱ्या दोन कसोटींच्या मालिकेसाठी भारतीय संघ विंडीजमध्ये याआधीच दाखल झाला असून सध्या ते बार्बाडोस येथे सराव करीत आहेत. यावेळी त्यांनी विंडीजचे माजी महान खेळाडू सर गारफिल्ड सोबर्स यांची भेट घेतली.
86 वर्षीय सोबर्स व त्यांच्या पत्नीची भारतीय खेळाडूंनी केनसिंग्टन ओव्हल येथे भेट घेतल्याचा व्हिडिओ बीसीसीआयने ट्विटरवर पोस्ट केला आहे. ‘बार्बाडोसमध्ये महान खेळाडूसोबत! टीम इंडियाने क्रिकेटमधील एक महान खेळाडू सर गारफिल्ड सोबर्स यांची भेट घेतली,’ असे बीसीसीआयने ट्विट केले आहे. विराट कोहली, कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल, अजिंक्य रहाणे, आर. अश्विन, प्रमुख प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सोबर्स यांच्यासमवेत काही वेळ गप्पा मारल्या.
2022 मध्ये विराट कोहलीला सर गारफिल्ड सोबर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते तर अश्विनला 2017 मध्ये वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू व वर्षातील सर्वोत्तम कसोटीपटू ठरल्याबद्दल आयसीसीने त्याला सोबर्स ट्रॉफी देऊन गौरविले होते. सोबर्स यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीत 93 कसोटीत 8032 धावा 57.78 धावांच्या सरासरीने जमविल्या. त्यात 26 शतके आणि 30 अर्धशतकांचा समावेश आहे.
विंडीज दौऱ्यात भारतीय संघ एकूण 8 सामने खेळणार असून दोन कसोटींची सुरुवात 12 जुलैपासून तर दुसरी कसोटी 20 जुलैपासून होईल. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर तीन सामन्यांची वनडे मालिका भारतीय संघ खेळेल. यातील पहिला सामना 27 तर दुसरा सामना 29 जुलैला बार्बाडोसमध्ये होईल. तिसरा सामना 1 ऑगस्टपासून त्रिनिदादमध्ये खेळविला जाणार आहे. यानंतर पाच सामन्यांची टी-20 मालिका दोन संघांत होईल. त्याची सुरुवात 3 ऑगस्टपासून होईल.









