त्रिपुराच्या परिवहन मंत्र्यांची माहिती
वृत्तसंस्था/ आगरतळा
बांगलादेशात हिंदू समुदायाला टार्गेट करण्याचे प्रकार सुरू असतानाच आता एका भारतीय बसवर हल्ला केल्याचे उघड झाले आहे. बांगलादेशातील ब्राह्मणबारिया जिह्यातील बिश्व रोडवर ही घटना घडल्याचे त्रिपुराच्या परिवहन मंत्र्यांनी सांगितले. श्यामोली ट्रॅव्हल्सची बस आगरतळाहून कोलकात्याला जात असताना हा प्रकार घडला. बस आपल्या लेनवरून जात असताना एका ट्रकने तिला मुद्दाम धडक दिली. याचदरम्यान, समोर असलेल्या ऑटोरिक्षाला बसची धडक बसली. यानंतर संतप्त जमावाने बसवर हल्ला करत तोडफोड केली. या घटनेनंतर स्थानिक लोकांनी बसमध्ये प्रवास करणाऱ्या भारतीय प्रवाशांना धमक्या देण्यास सुरुवात केली. त्यांनी भारतविरोधी घोषणाही दिल्या. तसेच भारतीय प्रवाशांना अपशब्द वापरत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे बसमधून प्रवास करणारे भारतीय प्रवासी घाबरले आहेत.
आगरतळा ते कोलकातादरम्यान धावणाऱ्या बसवर बांगलादेशात हल्ला झाल्याचा दावा त्रिपुराचे परिवहन मंत्री सुशांत चौधरी यांनी केला आहे. त्यांनी फेसबुकवर बसची छायाचित्रेही शेअर केली आहेत. तसेच या घटनेचा निषेध करत शेजारील देशाच्या प्रशासनाला भारतीय प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करण्याची विनंती करतो, असे त्यांनी म्हटले आहे. कोलकाता आणि आगरतळा दरम्यानच्या बसेस ढाकामार्गे धावतात. या मार्गाने गेल्यास एकंदर अंतर अर्ध्याहून अधिक कमी होते. हा प्रवास विमानाने प्रवास करण्यापेक्षा स्वस्त असून आसाममार्गे ट्रेनने प्रवास करण्यापेक्षा वेळही कमी लागतो.









