ऑनलाईन टीम / तरुण भारत :
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी एका भारतीय वंशाच्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. साई वर्षित कंदुला (वय 19) असे या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साई कंदुला हा चेस्टरफील्डचा ड्रायव्हर आहे. त्याने सोमवारी (23 मे) रात्री ट्रकने व्हाईट हाऊसला धडक दिली. या ट्रकमध्ये कोणतीही शस्त्रे किंवा स्फोटके नव्हती. त्यामुळे या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, या घटनेनंतर कंदुला यांने बायडेन यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. त्यानंतर कंदुला याला ट्रकसह पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, त्याने राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना हानी पोहोचवायची होती, अशी कबुली दिली. युएस पोलिसांनी राष्ट्राध्यक्षांना मारण्याचा कट रचल्याचा तसेच संघीय संपत्ती नष्ट करण्याच्या प्रयत्न केल्याचा आरोप करत कंदुला याला अटक केली.









