वर्जिनिया : गजाला हाशमी आता अबिगेल स्पॅनबर्गर यांच्यासोबत डेमोक्रेटिक पार्टीच्या तिकीटावर निवडणूक लढविणार आहेत. नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत निवडणूक होणार आहे. वर्जिनियात त्या पहिल्या भारतीय-अमेरिकन महिला लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून निवडून येऊ शकतात. गजाला हाशमी या स्टेटच्या महत्त्वाच्या पदासाठी नामांकन मिळविणाऱ्या पहिल्या मुस्लीम उमेदवार ठरल्या आहेत. लेफ्टनंट गव्हर्नर पदासाठी डेमोक्रेटिक प्राइमरी निवडणुकीत त्यांनी विजय मिळविला आहे. गजाला हाशमी यांनी लेफ्टनंट गव्हर्नर पदाच्या निवडणुकीत विजय मिळविल्यास इतिहास रचला जाणार आहे.
हे पद मिळविणाऱ्या त्या प्रांतातील पहिल्या मुस्लीम आणि भारतीय-अमेरिकन ठरणार आहेत. दुसरीकडे रिपब्लिकन उमेदवार जॉन रीड विजयी झाल्यास हे पद भूषविणारे ते प्रांताचे पहिले घोषित समलैंगिक व्यक्ती ठरतील. गजाला हाशमी सध्या स्टेट सिनेटर आहेत, त्या नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत युएस प्रतिनिधी अबीगॅल स्पॅनबर्गर यांच्यासोबत डेमोक्रेटिक पार्टीच्या वतीने सामील होतील. स्पॅनबर्गर हे गव्हर्नर पदासाठी डेमोक्रेटिक उमेदवार आहेत. गजाला हाशमी आणि स्टोनी यांच्यात डेमोक्रेटिक पार्टीच्या लेफ्टनंट गव्हर्नर पदाच्या उमेदवारीसाठी चुरस दिसून आली. स्पॅनबर्गर यांचे गव्हर्नर पदासाठीचे उमेदवार म्हणून बिनविरोध निवड झाली. आगामी निवडणुकीतून प्रांताला पहिल्यांदाच महिला गव्हर्नर मिळण्याची शक्यता आहे.









