पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली
वृत्तसंस्था/ लंडन
भारतीय वंशाचे ब्रिटिश अर्थतज्ञ लॉर्ड मेघनाद देसाई यांचे वयाच्या 85 वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला आहे. मेघनाद देसाई यांच्या निधनामुळे दु:खी आहे. ते एक प्रख्यात विचारवंत, लेखक आणि अर्थतज्ञ होते. भारत आणि भारतीय संस्कृतीशी ते जोडले गेलेले होते. भारत-ब्रिटन संबंध मजबूत करण्यात त्यांनी भूमिका बजावली होती. त्यांच्यासोबतचा संवाद मी नेहमीच आठवणीत ठेवणार आहे असे उद्गार मोदींनी काढले आहेत. मेघनाद देसाई यांचा जन्म 1940 साली वडोदरा येथे झाला होता. त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ पेंसिल्वेनियामधू अर्थशास्त्रात पीएचडी पूर्ण केली होती. 1965 मध्ये ते लंडन येथे स्थलांतरित झाले आणि लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्सशी जोडले गेले. तेथे ते व्याख्यात्यांपासून प्राध्यापक आणि मग प्रोफेसर एमेरिटस झाले.
1991 मध्ये ब्रिटनच्या संसदेच्या हाउस ऑफ लॉर्ड्समध्ये लेबर पार्टीकडून त्यांना पीयर करण्यात आले. भारत सरकारने 2008 साली त्यांना पद्मभूषणने गौरविले होते. भारतापासून दूर राहत असतानाही ते भारतीय संस्कृती आणि अर्थकारणावर सातत्याने लिखाण करत राहिले.









