वृत्तसंस्था/ एडमोंटन
कॅनडाच्या दक्षिण एडमोंटन शहरात गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेत भारतीय वंशाच्या इसमासमवेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. एडमोंटन येथील गिल बिल्ट होम्सचे मालक बूटा सिंह गिल यांना या गोळीबारात जीव गमवावा लागला आहे. कॅनडात मागील काही काळापासून भारतीयांना लक्ष्य करण्याच्या अनेक घटना घडल्याने चिंता व्यक्त होऊ लागली आहे.
सोमवारी 8 एप्रिल रोजी शहरात गोळीबाराची घटना घडली होती अशी माहिती एडमोंटन शहराच्या पोलिसांनी दिली आहे. या गोळीबारात 3 जण जखमी झाले होते. यात 49 वर्षीय आणि 57 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला होता. तर 51 वर्षीय पुरुष गंभीर जखमी झाला होता. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतदेहावरील उत्तरीय तपासणी झाल्यावर तपासाला वेग येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.









