‘भगवद्गीते’वर हात ठेवून पद-गोपनीयतेची शपथ
वृत्तसंस्था/ ओटावा
भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांना कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री बनवण्यात आले आहे. मंगळवारी त्यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. कॅनडामध्ये 28 एप्रिल रोजी सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान झाले. लिबरल पार्टी आणि पंतप्रधान मार्क कार्नी यांनी हे जिंकले. या निवडणुकीत भारतीय वंशाचे 22 उमेदवार विजयी झाले आहेत.
परराष्ट्रमंत्रिपदी नियुक्ती होताना अनिता यांनी पवित्र हिंदू धर्मग्रंथ ‘भगवद्गीता’वर हात ठेवून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. शपथविधी सोहळ्यादरम्यान अनिता आनंद यांनी ‘भगवद्गीते’वर हात ठेवून शपथ घेणे हे त्यांच्या सांस्कृतिक संबंध आणि मूल्यांचे प्रतीक होते. शपथविधीनंतर त्यांनी ‘कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री म्हणून निवड झाल्याचा मला अभिमान आहे. पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यासोबत जवळून काम करण्याची आणि एक चांगले आणि सुरक्षित जग निर्माण करण्यासाठी योगदान देण्याची ही माझ्यासाठी एक उत्तम संधी आहे. मी या दिशेने आमच्या टीमसोबत वचनबद्धतेने काम करेन’ असे स्पष्ट केले.
भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची देशाच्या नवीन परराष्ट्र मंत्री म्हणून निवड केली. अनिता आनंद या यापूर्वी माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदाचा भाग होत्या. अनिता यांचा प्रशासकीय अनुभव पाहता कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी त्यांना ही महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. या फेरबदलाकडे कॅनडाच्या परराष्ट्र धोरणातील एका नवीन दृष्टिकोनाची सुरुवात म्हणून पाहिले जात आहे. पंतप्रधान मार्क कार्नी यांनी आपल्या मंत्रिमंडळात फेरबदल करत कॅनडाच्या राजकारणात एक ऐतिहासिक वळण आणण्याचा प्रयत्न केला आहे.
अनिता आनंद यांच्याव्यतिरिक्त मार्क कार्नी यांच्या मंत्रिमंडळात भारतीय वंशाचे तीन लोक आहेत. त्यापैकी मनिंदर सिंधू यांना आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्री बनवण्यात आले आहे. सिंधू यापूर्वी परराष्ट्रमंत्री होते. 2019 पासून ते सातत्याने निवडणुका जिंकत आहेत. याशिवाय रुबी सहोता आणि रणदीप सिंग सराई यांना राज्य सचिव बनवण्यात आले आहे.
अनिता यांचे तामिळनाडू, पंजाबशी नाते
अनिता आनंद यांचे वडील तामिळनाडूचे होते तर आई पंजाबची होती. तथापि, अनिता यांचा जन्म आणि वाढ कॅनडाच्या ग्रामीण भागात असलेल्या नोव्हा स्कॉशियामध्ये झाली. त्यांनी क्वीन्स युनिव्हर्सिटीमधून पॉलिटिकल सायन्समध्ये बॅचलर ऑफ आर्ट्स, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधून ज्युरिसप्रुडन्समध्ये बॅचलर ऑफ आर्ट्स, डलहौसी युनिव्हर्सिटीमधून ‘लॉ’मध्ये बॅचलर आणि टोरंटो युनिव्हर्सिटीमधून ‘मास्टर ऑफ लॉ’ पदवी प्राप्त केली आहे. 57 वर्षीय अनिता व्यवसायाने वकील आहेत. 2019 मध्ये त्यांनी कॅनडाच्या ओकव्हिल मतदारसंघातून पहिली संसदीय निवडणूक जिंकली होती.









