नेशन्स कप महिला हॉकी स्पर्धा डिसेंबरमध्ये
वृत्तसंस्था/ लुसाने, स्वित्झर्लंड
स्पेनमधील व्हॅलेन्सिया येथे होणाऱया एफआयएच नेशन्स कप महिला हॉकी स्पर्धेत भारताची सलामीची लढत कॅनडाविरुद्ध होणार आहे. डिसेंबर 11 ते 17 या कालावधीत ही स्पर्धा होत आहे.
भारताचा ब गटात समावेश असून कॅनडा, जपान, दक्षिण आफ्रिका यांचाही याच गटात समावेश आहे. अ गटात कोरिया, इटली, यजमान स्पेन, आयर्लंड यांचा समावेश करण्यात आला आहे. कॅनडाविरुद्धच्या लढतीनंतर भारताची दुसरी लढत जपानविरुद्ध 12 डिसेंबरला आणि 14 डिसेंबरला दक्षिण आप्रिकेविरुद्ध शेवटचा साखळी सामना होईल. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य लढती 16 डिसेंबरला आणि जेतेपदाची लढत 17 डिसेंबरला होणार आहे.
एफआयएच महिला हॉकी प्रो लीग 2021-22 मोसमात भारताने पहिल्यांदाच भाग घेतला होता आणि त्यात त्यांनी शानदार प्रदर्शन करीत तिसरे स्थान मिळविले. 2021-22 या मोसमात भारतीय महिला हॉकी संघाने उत्तम प्रदर्शन केले असून टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक चौथे स्थान मिळविले. त्यानंतर अलीकडेच झालेल्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत त्यांनी कांस्यपदक पटकावले होते.









