मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रशंसोद्गार : इंडियन ऑईलमुळे गोव्यात साकारणार दुग्धपेढी
पणजी : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन हे गोव्यातील सामाजिक दायित्वासाठी नेहमीच सहकार्य करण्यात पुढे राहिलेले आहे. त्यांच्या सहकार्यामुळे दीनदयाळ आरोग्य सेवा इस्पितळ इमारत आणि दीनदयाळ जनसेवा प्रतिष्ठानलाही मोठी मदत लाभली आहे. इंडियन ऑईलची सामाजिक दायित्व योजना खरोखरच कौतुकास्पद आहे. आता कृषि क्षेत्राला तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांना लाभ व्हावा, यासाठी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या सहकार्याने राज्यात दुग्धपेढी प्रकल्प पूर्णत्वास येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. इंडियन ऑईलच्या सामाजिक दायित्व योजनेद्वारे तसेच आरोग्यम यांच्या संयुक्त विद्यमाने उभारलेल्या दीनदयाळ आरोग्य सेवा इस्पितळाची इमारत दीनदयाळ जनसेवा प्रतिष्ठानला हस्तांतरित केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते.
हा कार्यक्रम पर्वरी येथील मंत्रालयात झाला. यावेळी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे व आरोग्यमचे पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री सावंत म्हणाले, इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या संयुक्त विद्यमाने देशातही अशा प्रकारच्या दुग्धपेढी उभारण्यात आलेल्या आहेत. त्याच धर्तीवर राज्यात दूध संकलनासाठी ही दुग्धपेढी उभारण्यात येणार आहे. गोव्यातील विविध ठिकाणाहून दूध संकलन करण्यास वाव आहे. त्यादृष्टीनेच सरकारतर्फे हा विचार करण्यात येत आहे. त्याचा लाभ दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी ही दुग्धपेढी उपयुक्त ठरेल, असेही ते म्हणाले. इंडियन ऑईलची सामाजिक दायित्व योजना, आरोग्यम यांच्या संयुक्त सहकार्याने उभारलेली दीनदयाळ आरोग्य सेवा इस्पितळ इमारत दीनदयाळ जनसेवा प्रतिष्ठानला हस्तांतरित करण्यात आली असून, हे 50 खाटांचे अॅलोपॅथिक आणि आयुर्वेदिक इस्पितळ आहे.









