वृत्तसंस्था/कोलकाता
तेल क्षेत्रातील कंपनी इंडियन ऑइल कार्पोरेशनचा तिमाही निकाल जाहीर झाला असून कंपनीने 2 लाख 18 हजार 899 कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये उत्पन्न एक टक्का कमी आहे.मागच्या वर्षी समान तिमाहीमध्ये 2 लाख 21 हजार 533 कोटी रुपयांची कमाई कंपनीने केली होती. मागच्या तिमाहीच्या तुलनेमध्ये पाहता या तिमाहीत कमाई तेवढीच आहे.
7265 कोटींचा नफा
7265 कोटी निव्वळ नफा कंपनीने प्राप्त केला आहे. ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीच्या तुलनेमध्ये निव्वळ नफा 153 टक्के अधिक आहे. वर्षाच्या आधारावर पाहता 50 टक्के इतकी वाढ नोंदवली गेली आहे. महसूल एक टक्का घसरून 2.18 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने सांगितले की ते आपल्या समभागधारकांना प्रति समभाग 3रुपये लाभांश देणार आहेत.
समभागाची कामगिरी
चौथ्या तिमाही निकालानंतर कंपनीचा समभाग शेअरबाजारामध्ये 30 एप्रिल रोजी 1 टक्का इतका वाढत 137 रुपयांवर पोहोचला होता. गेल्या पाच दिवसांमध्ये समभाग एक टक्का, सहा महिन्यांमध्ये 3.77 टक्के आणि एक वर्षांमध्ये 18 टक्के इतका समभाग घसरलेला पाहायला मिळाला. मात्र गेल्या एक महिन्यातील परतावा मात्र चार टक्के अधिक पाहायला मिळाला. कंपनीचे बाजार भांडवल मूल्य 1.95 लाख कोटी रुपयांवर पोहचले आहे.









