महिलेच्या आईकडून शिक्षेविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येमेनच्या सर्वोच्च न्यायालयाने भारतीय नर्स निमिषा प्रियाला ठोठावण्यात आलेल्या मृत्युदंडाच्या विरोधात दाखल याचिका फेटाळली आहे. निमिषावर एका येमेनी नागरिकाच्या हत्येचा आरोप असून याप्रकरणी ती 2017 पासून तुरुंगात आहे. याप्रकरणी अंतिम निर्णय आता येमेनच्या अध्यक्षांवर निर्भर असल्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे. निमिषा प्रियाच्या आईने दाखल केलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला एका आठवड्याच्या आत पावले उचलण्याचा निर्देश दिला.
निमिषा प्रियाने येमेनचा नागरिक तलाल अब्दो महदीच्या ताब्यातून स्वत:चा पासपोर्ट परत मिळविण्यासाठी त्याला गुंगी आणणाऱ्या औषधाचे इंजेक्शन टोचले होते. परंतु ओव्हरडोसमुळे तलालचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी निमिषाला येमेनच्या न्यायालयाकडून 2018 मध्ये दोषी ठरविण्यात आले होते.
निमिषाची सहकारी हनान ही येमेनची नागरिक असून तिला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हनानने महादीच्या मृतदेहाला पाण्याच्या टाकीत फेकण्यापूर्वी त्याचे तुकडे केले होते.
प्रियाच्या आईने चालू वर्षाच्या प्रारंभी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत भारतीय नागरिकांसाठी प्रवासावर बंदी असूनही येमेनचा प्रवास करण्यासाठी अनुमती मागितली होती. तसेच स्वत:च्या मुलीला वाचविण्यासाठी ब्लड मनीवर चर्चा केली होती. कुठलाही गुन्हेगार किंवा त्याच्या कुटुंबाकडून पीडिताच्या कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या रकमेला ब्लड मनी म्हटले जाते.
स्वत:च्या मुलीला वाचविण्याचा एकमात्र मार्ग म्हणजे पीडित कुटुंबाशी संपर्क साधणे असल्याचे निमिषाच्या आईचे म्हणणे आहे. येमेनसाठी प्रवास निर्बंध शिथिल केले जाऊ शकतात, ज्यामुळे भारतीय नागरिकांना विशिष्ट कारण आणि मर्यादित कालावधीसाठी येमेनचा प्रवास करण्याची अनुमती मिळू शकते असे केंद्र सरकारच्या वकिलाने उच्च न्यायालयात सांगितले आहे. उच्च न्यायालयाने प्रथम केंद्र सरकारला महिलेला वाचविण्यासाठी ब्लड मनीविषयक चर्चा करण्याचा निर्देश देण्यास नकार दिला होता. परंतु येमेनमधील शिक्षेच्या विरोधात कायदेशीर उपाययोजना करण्यास सांगितले होते.
महदीने खोटे दस्तऐवज तयार करवून घेत आपला निमिषासोबत विवाह झाल्याचा दाखविण्याचा प्रयत्न केला होता. महदीकडून निमिषासोबत गैरवर्तन केले जात होते तसेच मानसिक स्वरुपात तिला त्रास दिला जात होता असा दावा याचिकेत करण्यात आला होता.









