वृत्तसंस्था/ मुंबई
ओमानच्या किनाऱ्यानजीक मासेमारी करत असलेल्या एका पाकिस्तानी नौकेच्या चालक दलाच्या सदस्याला भारतीय नौदलाच्या आयएनएस त्रिकंद या युद्धनौकेने त्वरित वैद्यकीय मदत पुरविली आहे. भारतीय नौदलाने एक इमर्जन्सी कॉलला प्रतिसाद देत मदतीसाठी धाव घेतली होती.
आयएनएस त्रिकंदने एक इराणी डाउ ‘अल ओमेडी’वरून इमर्जन्सी कॉल प्राप्त केला, संबंधित नौका ओमानच्या किनाऱ्यापासून सुमारे 350 सागरी मैल अंतरावर होती. डाउच्या चालक दलाचा एक सदस्य गंभीर जखमी झाला होता, अशा स्थितीत आयएनएस त्रिकंदने स्वत:ची दिशा बदलून पाकिस्तानी मच्छिमाराला वैद्यकीय मदत प्रदान केली आहे.
युद्धनौकेवरील वैद्यकीय अधिकारी आणि मार्कोस कमांडोच्या टीमने जखमी मच्छिमारावर उपचार केले आहेत. अॅनेस्थीशिया देत टीमने तीन तासापर्यंत शस्त्रक्रिया केली आणि रक्तस्राव रोखला आहे. यामुळे हाताच्या बोटांना होणारे नुकसान टाळण्यात आले आहे. आयएनएस त्रिकंदने पाकिस्तानी मच्छिमाराचा जीव वाचविल्यावर नौकेला अन्य वैद्यकीय सामग्री प्रदान केली. यानंतर नौकेच्या चालक दलाने भारतीय नौदलाचे आभार मानले आहेत.









