वृत्तसंस्था/ सिंगापूर
भारतीय पुरुष टेबल टेनिस संघाने आशियाई चॅम्पिनशिप स्पर्धेत दमदार कामगिरी करताना सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व सामन्यात भारताने यजमान सिंगापूरविरुद्ध 3-0 असा एकतर्फी विजय मिळवत किमान कांस्यपदक निश्चित केले आहे. उपांत्य फेरीत भारतीय संघाचा सामना चिनी तैपेई किंवा इराण बरोबर होईल. दुसरीकडे महिला संघाला मात्र उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागल्याने त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे.
सोमवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीतील लढतीत शरथ कमलने सिंगापूरच्या इजाक क्वेकचा दारुण पराभव केला. शरथने क्वेकविरुद्धचा पहिला एकेरी सामना 11-1, 10-12, 11-8, 11-13 आणि 14-12 अशा फरकाने जिंकला. या विजयानंतर पुढील सामन्यात भारताच्या के जी साथियानने कियोन पांगचा 11-6, 11-8, 12-10 अशा फरकाने पराभव केला. यानंतर तिसऱ्या सामन्यात हरमीत देसाईने च्यू झे यूचा 11-9, 11-4 आणि 11-6 असा पराभव करत संघाचे सेमीफायनलमधील स्थान निश्चित केले. आता, सेमीफायनलमध्ये भारताचा सामना आता चिनी तैपेई किंवा इराणच्या संघासोबत होणार आहे. दरम्यान, यापूर्वी टेबल टेनिस संघाने दोन वर्षांपूर्वी दोहा येथे कांस्यपदक जिंकले होते.
महिला संघाला पराभवाचा धक्का
दरम्यान, भारतीय महिला टेबल टेनिस संघाची कामगिरी निराशाजनक झाली. तिन्ही एकेरीच्या सामन्यात महिला संघाला जपानकडून पराभव स्वीकारावा लागला. पहिल्या सामन्यात अहिकाला जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असलेल्या मिमाने 11-7, 15-13, 11-8 असे तर मनिका बात्राला हिना हयाताने 11-7, 11-9, 11-3 असे तर सुतीर्थ मुखर्जीला मियो हिरानोने 11-7, 11-4, 11-6, 11-5 असे नमवले. आता, महिला संघ पाचव्या स्थानासाठी खेळणार आहे. दरम्यान, भारतीय महिला संघात मनिका बत्रा, सुतीर्थ मुखर्जी आणि अहिका मुखर्जी यांचा समावेश होता.









