विश्वचषक कबड्डी स्पर्धा, इटलीचा सलामीच्या सामन्यात पराभव
वृत्तसंस्था / बर्मिंगहॅम
येथे सुरू झालेल्या विश्वकबड्डी फेडरेशनच्या 2025 च्या विश्व चषक पुरुष आणि महिलांच्या कबड्डी स्पर्धेत विद्यमान विजेत्या भारतीय पुरुष संघाने आपल्या मोहीमेला विजयाने प्रारंभ केला. ब गटातील झालेल्या सलामीच्या सामन्यात भारताने इटलीचा 64-22 अशा गुणांनी पराभव केला.
सदर स्पर्धा दुसऱ्यांदा भरविली जात आहे. तत्पूर्वी म्हणजे 2019 साली मलेशियात पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या विश्वचषक कब•ाr स्पर्धेत भारताच्या पुरूष आणि महिला कबड्डी संघांनी अजिंक्यपद पटकाविले होते. भारताच्या पुरुष संघाने अंतिम सामन्यात इराकचा पराभव केला होता. तर महिलांच्या विभागात भारताने अंतिम लढतीत चीन तैपेईला पराभूत करुन जेतेपदाला गवसणी घातली होती.
भारत आणि इटली यांच्यातील हा सामना चुरशीचा झाला. पण सामन्याच्या उत्तराधार्थ भारतीय संघातील आघाडी फळीत खेळणाऱ्या कबड्डी पटूंनी आपल्या जलद आणि चढायांवर झटपट गुण वसुल केले. ब गटात आता भारतीय पुरुष संघाने पहिल्या सामन्यातील विजयामुळे दोन गुणांसह आघाडीचे स्थान घेतले आहे. या गटात स्कॉटलंड दुसऱ्या स्थानावर आहे. स्कॉटलंडने आपल्या सलामीच्या सामन्यात वेल्सचा 63-43 अशा 20 गुणांच्या फरकाने पराभव केला. भारतीय पुरुष कबड्डी संघाचा पुढील सामना स्कॉटलंडबरोबर होत आहे.
सदर स्पर्धेतील सामने इंग्लंडमधील चार शहरांमध्ये खेळविले जात आहेत. पुरुषांच्या विभागात एकूण 10 संघांचा समावेश आहे. अ गटात हंगेरी, इंग्लंड, पोलंड, जर्मनी आणि अमेरिका तर ब गटात भारत, इटली, स्कॉटलंड, वेल्स आणि हाँगकाँग यांचा समावेश आहे. सदर स्पर्धा सिंगल हेडेड राऊंडरॉबीन पद्धतीने खेळविली जात असून या दोन गटातील आघाडीचे प्रत्येकी चार संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्यपुर्व फेरीला 21 मार्चपासून प्रारंभ होईल.
महिलांच्या विभागात एकूण 6 संघांचा समावेश आहे. हे सहा संघ दोन गटात विभाण्यात आले आहेत. ड गटामध्ये भारत, वेल्स आणि पोलंड तर इ गटामध्ये हाँगकाँग, हंगेरी आणि इंग्लंड यांचासमावेश आहे. या दोन गटातील आघाडीचे प्रत्येकी दोन संघ उपांत्यफेरीसाठी पात्र ठरणार आहेत. भारतीय महिला संघाचा सलामीचा सामना वेल्सबरोबर होणार आहे.









