पहिल्या सामन्यात जर्मनीकडून भारताचा धुव्वा, दुसऱ्या सामन्यात भारताची एकमेव गोलने बाजी
वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
एफआयएच प्रो लीगमधील येथे झालेल्या सामन्यात जागतिक विजेत्या जर्मन संघाकडून भारताला 1-4 असा पराभव पत्करावा लागला. भारताचा बचाव कमकुवत होता आणि तिसऱ्या सत्रात त्यांच्याकडे गुणवत्तेचा अभावही दिसून आला. बुधवारी झालेल्या परतीच्या सामन्यात मात्र भारताने जर्मनीवर एका गोलने विजय मिळविला.
बुधवारच्या सामन्यात मात्र भारताने सुधारित प्रदर्शन करीत चौथ्याच मिनिटाला गुर्जंत सिंगने मैदानी गोल नोंदवून भारताला आघाडी मिळवून दिली. या सामन्यावर भारतानेच वर्चस्व राखले होते. यापैकी चौथ्या व शेवटच्या सत्रात मात्र जर्मनीने बरोबरीसाठी जोरदार आक्रमण करीत वर्चस्व ठेवले होते. पण भारताच्या भक्कम बचावामुळे त्यांना यश मिळू शकले नाही. जर्मनीने एकूण सात पेनल्टी कॉर्नर्स मिळविले, त्यातील पाच शेवटच्या सत्रात मिळविलेले होते. पण ते भारताने फोल ठरविले. भारताला मात्र सामन्यात केवळ दोनच पेनल्टी कॉर्नर्स मिळाले आणि ते दोन्हीही वाया गेले.
मंगळवारच्या सामन्यात जर्मनीचा एकतर्फी विजय
फ्लोरियन स्पर्लिंगने सातव्या मिनिटाला केलेल्या गोलने जर्मनीला आघाडी मिळवून दिली परंतु गुरजंत सिंग (13 व्या मिनिटाला गोल) याने सहा मिनिटांत भारताला बरोबरी साधून दिली. पहिल्या सत्रामध्ये तीन गोल नोंदवले जाऊन थिस प्रिंझ (14 वे मिनिट) याने गोल केल्याने एका मिनिटानंतर जर्मनीला पुन्हा आघाडी मिळाली.
दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रामध्ये सामना गोलशून्य राहिल्यानंतर मिशेल स्ट्रुथॉफ (48 वे मिनिट) आणि राफेल हार्टकोफ (55 वे मिनिट) यांनी चौथ्या आणि शेवटच्या सत्रामध्ये दोन गोल करून जर्मनीला पॅरिस ऑलिंपिकमधील कांस्यपदक विजेत्या संघाविऊद्ध विजय मिळवून दिला. या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व वरिष्ठ बचावपटू अमित रोहिदासने केले. कारण नियमित कर्णधार हरमनप्रीत सिंग सुऊवातीच्या 11 खेळाडूंचा भाग नव्हता. तथापि, सदर चॅम्पियन ड्रॅग फ्लिकरने सुऊवात का केली नाही, हे स्पष्ट झाले नाही.
हरमनप्रीतला दुसऱ्या सामन्यातही विश्रांती देण्यात आली होती. गेल्या सामन्यात स्पेनवर 2-0 असा विजय मिळवल्यानंतर भारताची सुऊवात चांगली होऊ शकली नाही. कारण स्पर्लिंगने पहिला गोल केला आणि गोलरक्षक कृष्ण बहादूर पाठक धोका दूर करू शकला नाही. सुऊवातीच्या जर्मन यशाने अस्वस्थ न होता भारताने अनुभवी फॉरवर्ड गुरजंतच्या माध्यमातून बरोबरी साधली. तथापि, जर्मनीने क्षणार्धात पुन्हा आघाडी मिळवली.
पहिल्या सत्राच्या शेवटी जर्मनीने 2-1 अशी आघाडी घेतली. 20 व्या मिनिटाला भारताला बरोबरी साधण्याची उत्तम संधी होती, परंतु राजिंदरचा पास वळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुरजंतला लक्ष्य हुकले. चार मिनिटांनंतर अर्शदीप सिंगचा गोल करण्याचा प्रयत्न थोड्याशा फरकाने हुकला, तर पर्यायी गोलरक्षक सूरज करकेरान स्पर्लिंगला यश मिळू दिले नाही. मध्यांतराच्या पूर्वी भारताकडे चेंडूचा अधिक ताबा होता, परंतु त्यात फिनिशिंगचा अभाव होता.
सामना तिसऱ्या सत्रात प्रवेश करत असताना भारतान त्यांची कामगिरी सुधारण्याची आवश्यकता होती, परंतु जर्मन शांत राहिले आणि त्यांनी आघाडी कायम ठेवली. तिसऱ्या सत्रात पेनल्टी कॉर्नर ही भारतासाठी समस्या राहून ते त्यांचे रूपांतर करण्यात अयशस्वी झाले. तीन सामन्यांमधील भारताचा हा दुसरा पराभव आहे.









