वृत्तसंस्था/ केपटाऊन
भारतीय पुरुष हॉकी संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने यजमान द. आफ्रिकेचा 3-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव केला. आता भारताचा या स्पर्धेतील पुढील सामना रविवारी नेदरलँड्स बरोबर होणार आहे.
भारत आणि द. आफ्रिका यांच्यातील झालेल्या सामन्यात कर्णधार हरमनप्रित सिंगने दुसऱ्याच मिनिटाला भारताचे खाते उघडले. 13 व्या मिनिटाला भारताचा दुसरा गोल अभिषेकने तर तिसरा गोल 30 व्या मिनिटाला सुमितने नोंदवला. सुरुवातीपासूनच भारताने आक्रमक आणि वेगवान खेळावर भर दिल्याने त्यांना दुसऱ्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि कर्णधार हरमनप्रित सिंगने या संधीचा फायदा उठविला. मध्यंतरापर्यंत भारताने द. आफ्रिकेवर 3-0 अशी आघाडी घेतली होती. अभिषेक आणि सुमित यांनी मैदानी गोल केले. सामन्यातील शेवटच्या 15 मिनिटांच्या कालावधीत द. आफ्रिकेने आक्रमक पवित्रा घेत खाते उघडण्याचा प्रयत्न केला पण भारताच्या भक्कम बचावफळीमुळे त्यांना शेवटपर्यंत गोल नोंदवता आला नाही.