वृत्तसंस्था/ हांगझोऊ, चीन
19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष हॉकी या क्रीडा प्रकारात भारतीय हॉकी संघाने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. बुधवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने दक्षिण कोरियाचा 5-3 अशा गोलफरकाने पराभव केला. आता या क्रीडा प्रकारात सुवर्णपदकासाठी भारताची लढत येत्या शनिवारी माजी विजेते जपान आणि चीन यांच्या लढतीतील विजयी संघाबरोबर होईल.
हरमनप्रित सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाने या स्पर्धेमध्ये प्राथमिक गटातील सामन्यात प्रतिस्पर्ध्यावर मोठे विजय नोंदवताना गोलांचा वर्षाव केला. मात्र बुधवारच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दक्षिण कोरियाकडून शेवटच्या क्षणापर्यंत भारताला कडवा प्रतिकार झाला. 2018 च्या जकार्ता आशियाई स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाला कास्यपदकावर समाधान मानावे लागले होते तर 2014 च्या इंचॉन आशियाई स्पर्धेत भारताने सुवर्णपदक पटकावले होते. यावेळी भारतीय संघाला सुवर्णपदकाची नामी संधी उपलब्ध झाली आहे. सध्या सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक घेतल्यास भारतीय पुरुष हॉकी संघाला 2024 च्या पॅरीस ऑलिम्पिकसाठी थेट प्रवेश मिळणार आहे.

बुधवारच्या सामन्यात पहिल्या 15 मिनिटांच्या कालावधीत भारताच्या खेळाडूंनी आक्रमक आणि वेगवान चालीच्या जोरावर तीन गोल नोंदवत द. कोरियावर 3-0 अशी आघाडी मिळवली होती पण त्यानंतर कोरियाच्या आघाडीफळीने भारतीय बचावफळीवर चांगलेच दडपण आणले. कोरियाच्या मांजेई जंगने शानदार हॅट्ट्रीक नोंदवली. त्याने 17 व्या, 20 आणि 42 व्या मिनिटाला असे तिन गोल केले. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघाला कास्यपदक मिळाले होते. बुधवारच्या उपांत्य सामन्यात पाचव्या मिनिटाला हार्दिक सिंगने भारताचे खाते उघडले. 11 व्या मिनिटाला मनदीप सिंगने गोल नोंदवून भारताची आघाडी वाढवली. 15 व्या मिनिटाला ललितकुमार उपाध्यायने भारताचा तिसरा गोल केला. 24 व्या मिनिटाला अमित रोहीदासने भारताचा चौथा गोल नोंदवला. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत भारताने चार गोल केले होते तर द. कोरियातर्फे दोन गोल या कालावधीत नोंदवले गेले. मध्यंतरावेळी भारताने द. कोरियावर 4-2 अशी आघाडी मिळवली होती. सामन्याच्या उत्तरार्धाला प्रारंभ झाल्यानंतर 42 व्या मिनिटाला जंगने कोरियाचा आणि वैयक्तिक तिसरा गोल नोंदवला. अभिषेकने 54 व्या मिनिटाला आपल्या संघाचा पाचवा गोल नोंदवून द. कोरियाचे आव्हान 5-3 असे संपुष्टात आणले. भारतीय संघातील मनदीप सिंगने या स्पर्धेत आतापर्यंत 10 गोल नोंदवले आहेत. कोरिया संघाला खेळाच्या दुसऱ्या 15 मिनिटाच्या सत्रात पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता आणि जंगने या संधीचा फायदा अचूकपणे घेतला. या सामन्यामध्ये भारतीय संघाकडून अनेक पेनल्टी कॉर्नर्स वाया गेले.









