वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आगामी पुरुषांच्या विश्व मुष्टियुद्ध चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी पूर्वतयारीकरिता 19 सदस्यांचा भारतीय मुष्टियुद्ध संघ सोमवारी ताश्कंदला रवाना झाला. ताश्कंदमध्ये मुष्टियोद्ध्यांसाठी सराव शिबिर आयोजित केले आहे. पुरुषांची विश्व मुष्टियुद्ध चॅम्पियनशीप स्पर्धा 30 एप्रिल ते 14 मे दरम्यान होणार आहे.
या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय मुष्टियुद्ध संघामध्ये आतापर्यंत सहावेळा आशियाई चॅम्पियनशीप स्पर्धेत पदक मिळविणारा शिवा थापा तसेच 2019 च्या आशियाई स्पर्धेतील रौप्यपदक विजेता दीपक भोरिया यांच्या कामगिरीवर प्रामुख्याने लक्ष राहील. ताश्कंदमध्ये होणाऱ्या पुरुषांच्या विश्व मुष्टियुद्ध चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्याला 2 लाख अमेरिकन डॉलर्स, रौप्यपदक विजेत्याला 1 लाख डॉलर्स तर कांस्यपदक मिळविणाऱ्या दोन्ही स्पर्धकांना प्रत्येकी 50 हजार डॉलर्सचे बक्षिस दिले जाणार आहे. ताश्कंदमधील या स्पर्धेसाठी भारताच्या 13 स्पर्धकांचा समावेश असून अन्य 6 मुष्टियोद्धे लवकरच ताश्कंदमधील सराव शिबिरात दाखल होणार आहेत. 2018 च्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक विजेता अमित पांगलचा यामध्ये समावेश आहे.
ताश्कंदमध्ये होणाऱ्या या आगामी स्पर्धेत आतापर्यंत 104 देशांच्या 640 मुष्टियोद्ध्यांची अधिकृत नोंद झाली आहे. या मुष्टियोद्ध्यांमध्ये 7 विद्यमान विश्वविजेत्यांचा समावेश आहे. फ्रान्सचा सोफेनी ओमिहा, जपानचा टोमोया सुबोई व ओकाझेवा, अझरबैजानचा लॉरेन अल्फोन्सो, कझाकस्तानचा सेकीन बिबोसिनोव्हृ क्युबाचे हेर्नांझे व ज्युलिओ लाक्रूझ यांचा समावेश आहे. ताश्कंदमधील ही मुष्टियुद्ध स्पर्धा सहा विविध वजनगटात घेतली जाणार आहे.
भारतीय मुष्टियुद्ध संघ- गोविंद सहानी (48 किलो), दीपक भोरिया (51 किलो), सचिन सिवाच (54 किलो), मोहम्मद हुसामुद्दिन (57 किलो), वरिंदर सिंग (60 किलो), शिवा थापा (63.5 किलो), आकाश सांगवान (67 किलो), निशांत देव (71 किलो), सुमित कुंडू (75 किलो), आशिष चौधरी (80 किलो), हर्ष चौधरी (86 किलो), नवीन कुमार (92 किलो), नरेंद्र बेरवाल (92 किलोवरील).
सराव शिबिरासाठी भारतीय संघ- गोविंद सहानी, दीपक भोरिया, अमित पांगल, सचिन सिवाच, मोहम्मद हुसामुद्दिन, सचिन, वरिंदर सिंग, शिवा थापा, वंशज, आकाश सांगवान, निशांत देव, हेमंत यादव, सुमित कुंडू, आशिष चौधरी, संजय, हर्ष चौधरी, नवीन कुमार, संजित आणि नरेंद्र बेरवाल.









