वृत्तसंस्था / नवी दिल्ली
लंडनमध्ये होणाऱ्या आगामी विश्व टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी आपले तिकीट आरक्षित केले आहे. काठमांडू येथे झालेल्या द. आशियाई विभागीय टेबट टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघांनी दर्जेदार कामगिरी केल्याने त्यांना विश्व टेटे स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध करता आली.
लंडनमध्ये होणाऱ्या विश्व टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी आशिया खंडातून केवळ 16 संघांनी तसेच मध्य आशिया, द. आशिया, दक्षिण-पूर्व आशिया आणि प. आशिया या चार विभागातून प्रत्येकी 4 विभागीय चॅम्पियन्सना पात्र ठरविण्यात आले. काठमांडूमध्ये झालेल्या द.आशियाई विभागीय टेबट टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी दर्जेदार कामगिरी करत शेवटपर्यंत एकही पराभव पत्करला नाही. ही स्पर्धा 5 देशांमध्ये राऊंडरॉबीन पद्धतीने खेळविली गेली. भारताच्या पुरुष संघामध्ये आकाश पाल, रोनीत भांजा, अनिर्बन घोष, पी. बी. अभिनंद आणि दिव्यानेश श्रीवास्तव यांचा समावेश होता. भारतीय पुरुष संघाने बांगलादेश, लंका, नेपाळ आणि मालदिव या संघांचा 3-0 अशा समफरकाने पराभव केला. भारताच्या महिला संघामध्ये कृत्वीका सिंन्हा, सेलेनादिप्ती सेलव्हाकुमार, तनिषा कोटेचा, सायली वाणी आणि सिंड्रेला दास यांचा समावेश होता. भारतीय महिला संघाने चार प्रतिस्पर्ध्यांवर एकतर्फी विजय मिळवित विश्व टेबल टेनिस स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली.









