वृत्तसंस्था/ हाँगझाऊ
19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत मंगळवारी पुरुषाच्या कबड्डी मध्ये झालेल्या प्राथमिक गटातील सामन्यात भारताने बांगलादेशचा 55-18 अशा गुणांनी एकतर्फी पराभव केला. भारतीय पुरुष कबड्डी संघाने 2018 साली झालेल्या जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक मिळविले होते. कबड्डी या क्रीडा प्रकारात यावेळी भारतीय संघ सुवर्ण पदक मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे. महिलांच्या कब•ाr या क्रीडा प्रकारात भारताने दक्षिण कोरियाचा पराभव केला.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यात मध्यंतरापर्यंत भारताने बांगलादेशवर 24-9 अशा गुणांनी आघाडी मिळविली होती. भारतीय संघातील नवीनकुमार गोयत आणि अर्जुन देसवाल यांनी आपल्या शानदार चढायावर गुण वसुल केले. 12 व्या मिनिटाला बांगलादेशचे पहिल्यांदा सर्व गडी बाद झाले. पहिल्या 20 मिनिटाच्या कालावधीत भारताने बांगलादेशवर 12 गुणांची आघाडी घेतली होती. पवन सेहरावत आणि गोयत यांचा खेळ दर्जेदार झाला.
महिलांच्या कबड्डी मध्ये 2018 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला संघाने रौप्यपदक मिळविले होते. मंगळवारी झालेल्या सामन्यात भारतीय महिला कबड्डी संघाने दक्षिण कोरियाचा 56-23 अशा गुण फरकाने पराभव केला.
सिंधू , प्रणॉय उप-उपांत्यपूर्व फेरीत
बॅडमिंटन या क्रीडा प्रकारात भारताचे अव्वल बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि एच. एस. प्रणॉय यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीच्या उप उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. सातव्या मानांकित प्रणॉयने मंगोलियाच्या बी. मूनखाबतचा 21-9, 21-12 अशा सरळ गेम्समध्ये केवळ 25 मिनिटात पराभव करत उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याप्रमाणे महिला एकेरीच्या सामन्यात भारताची माजी विश्वविजेती पी. व्ही. सिंधूने चीन तैपेईच्या 21 व्या मानांकित हेसू हिचा 21-10, 21-15 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. या स्पर्धेत पुरुषांच्या सांघिक चॅम्पियनशीपमधील चीनविरुद्धच्या अंतिम लढतीत प्रणॉयला पाठीच्या दुखापतीमुळे खेळता आले नव्हते.
डायव्हिंगमध्ये भारताची निराशा
डायव्हिंग या क्रीडा प्रकारात भारताच्या स्पर्धकाकडून निराशा झाली. या क्रीडा प्रकारात सहभागी झालेले भारताचे सिद्धार्थ परदेशी आणि लंडन सिंग हेमाम यांना पुरुषांच्या 3 मी. स्प्रिंगबोर्ड डायव्हिंग प्रकारात अंतिम फेरी गाठता आली नाही. प्राथमिक फेरीमध्ये परदेशीला 16 व्या तर हेमामला 17 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. आता पुरुषांच्या 10 मी. प्लॅटफॉर्म डायव्हिंग प्रकारात बुधवारी सिद्धार्थ सहभागी होणार आहे. डायव्हिंग या क्रीडा प्रकारातील बुधवार हा शेवटचा दिवस आहे.
सेपाकटकरॉमध्ये भारताची हार
सेपाकटकरॉ क्वाड्रंट या क्रीडा प्रकारात मंगळवारी सांघिक अंतिम टप्प्यातील पात्रतेसाठी झालेल्या उपांत्य लढतीत कोरियाने भारताचा 2-1 असा पराभव केला. या सामन्यात विजय मिळाला असता तर भारताला पुढील फेरी गाठता आली असती. ब गटात भारताला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यामुळे या गटातून जपान आणि फिलिपीन्स यांनी तर अ गटातून इंडोनेशिया व म्यानमार यांनी उपांत्य फेरी गाठली आहे. या क्रीडा प्रकारात भारताला सलामीच्या सामन्यात जपानने 2-0 असे पराभूत केले होते. त्यानंतर भारतीय संघाने सिंगापूरचा 2-0 तसेच फिलिपीन्सचा 2-0 असा पराभव करत आपली विजयी घौडदोड राखली होती, पण कोरियाने भारताचे आव्हान संपुष्टात आणले. सेपाकटकरॉ क्वाड्रंट या क्रीडा प्रकारामध्ये भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत आजपर्यंत एकमेव कांस्यपदक 2018 च्या जकार्ता स्पर्धेत मिळविले होते.









