मृत कर्नाटकचा रहिवासी : वॉशिंग मशीनवरून झालेला वाद ठरला जीवघेणा : गुन्हेगार क्यूबामधून आलेला अवैध स्थलांतरित
वृत्तसंस्था/ ह्यूस्टन
अमेरिकेच्या टेक्सासमध्ये एका भारतीय वंशाच्या मॉटेल मॅनेजरची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. मॅनेजरचे स्वत:च्या सहकाऱ्यासोबत वॉशिंग मशीनवरून वाद सुरु झाला होता. 50 वर्षीय चंद्रमौळी नागमल्लय्या यांचे शीर धडावेगळे करत त्यांच्या पत्नी आणि मुलासमोरच सहकाऱ्याकडून हत्या करण्यात आली. डलासच्या टेनिसन गोल्फ कोर्सनजीक डाउनटाउन सुइट्सड मॉटेलमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. तर मारेकरी हा क्यूबाचा नागरिक होता आणि अवैध स्वरुपात अमेरिकेत वास्तव्य करत असल्याचे समोर आले आहे. मूळचे कर्नाटकचे रहिवासी चंद्रमौली नागमल्लैया यांनी कोबोस-मार्टिनेज आणि एका महिला सहकाऱ्याला बिघडलेल्या वॉशिंग मशीनचा वापर न करण्याची सूचना केली होती. यामुळे मार्टिनेज संतापला आणि नागमल्लैया यांनी आपल्याशी थेट बोलण्याऐवजी महिला सहकाऱ्याला त्याला समजाविण्यास सांगितले होते.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये 37 वर्षीय कोबोस-मार्टिनेजला एक मोठा चाकू बाहेर काढत नागमल्लय्या यांच्यावर हल्ला करतान पाहिले गेले आहे. यानंतर नागमल्लय्या हे ऑफिसच्या दिशेने पळाले, तेथे त्यांची पत्नी आणि 18 वर्षीय मुलगा होता, तरीही कोबोसने त्यांचा पाठलाग करत नागमल्लय्या यांचे शीर धडावेगळे केले. या घटनेचा भयावह व्हिडिओ समोर आला असून यात आरोपी धडावेगळे केलेल्या शीराला लाथाडताना आणि मग ते कचरापेटीत टाकत असल्याचे दिसून येते. आरोपीची पार्श्वभूमी गुन्हेगारीची असून हत्येप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. मार्टिनेजने ह्यूस्टनमध्ये यापूर्वीही अनेक गुन्हे केले असून यात वाहन चोरी आणि हल्ला करणे सामील आहे. हत्येप्रकरणी दोषी ठरल्यास त्याला आजीवन कारावास किंवा मृत्युदंडाची शिक्षा होऊ शकते.
बिडेन प्रशासनाने केली होती मुक्तता
जो बिडेन यांच्या मागील प्रशासनाने मार्टिनेज यासारख्या सऱ्हाईत गुन्हेगाराला तुरुंगात ठेवण्याऐवजी मुक्त केले होते. क्यूबाला निर्वासित करण्यासाठी पुरेशी विमाने नसल्याने त्याला देखरेखीत ठेवत मुक्त करण्यात आले होते. मार्टिनेज अमेरिकत कधीच मुक्तपणे फिरायला नको होता असे अमेरिकेच्या इमिग्रेशन आणि सीमाशुल्क अंमलबजावणी विभागाने म्हटले आहे.
भारतीय दूतावासाची पोस्ट
ह्यूस्टन येथील भारतीय महावाणिज्य दूतावासाने मॉटेल मॅनेजर नागमल्लय्या यांच्या मृत्यूप्रकरणी शोक व्यक्त केला. दूतावास याप्रकरणी बारकाईने नजर ठेवून आहे. संबंधित परिवाराच्या संपर्कात असून शक्य ती मदत करत आहोत. आरोपी डलास पोलिसांच्या ताब्यात असल्याचे भारतीय दूतावासाकडून सांगण्यात आले. नागमल्लय्या हे परिसरात अत्यंत लोकप्रिय होते.









