द्विपक्षीय तणाव कमी करण्यास हातभार लावणार जेसन मिलर
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेत दृष्टीकोन मांडण्यासाठी भारताकडून नियुक्त पॉलिटिकल लॉबिस्ट जेसन मिलर यांनी व्यापार आणि आयातशुल्कावरून अमेरिकेसोबत असलेल्या तणावादरम्यान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनातील काही अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. मिलर हे एसएचडब्ल्यू पार्टनर्स एलएलसीचे प्रमुख असून त्यांना भारतीय दूतावासाने एप्रिल महिन्यात एक वर्षासाठी 1.8 दशलक्ष डॉलर्सचे शुल्क देत नियुक्त केले होते.
ट्रम्प आणि अन्य अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीचा उद्देश मिलर यांनी स्पष्ट केला नाही, परंतु ट्रम्प यांच्यासोबतचे छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. ट्रम्प यांच्याकडून भारतीय उत्पादनांवरील आयातशुल्क 50 टक्के करण्यात आला आहे. भारताने अमेरिकेच्या या निर्णयाला चुकीचे आणि अविवेकपूर्ण ठरविले आहे.
या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांत द्विपक्षीय संबंधांमधील तणाव दूर करण्याच्या प्रयत्नांचे संकेत मिळाले आहेत. ट्रम्प यांनी शुक्रवारी भारत-अमेरिका संबंधांना खास संबोधित पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी मित्र राहतील असे वक्तव्य केले होते. तर पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली होती. ट्रम्प यांच्या भावना आणि आमच्या संबंधांच्या सकारात्मक मूल्यांकनाचे कौतुक करतो आणि त्यांचे पूर्ण समर्थन करतो. भारत आणि अमेरिकेदरम्यान अत्यंत सकारात्मक, दूरदर्शी आणि जागतिक रणनीतिक भागीदारी असल्याचे मोदींनी नमूद केले होते.
जेसन मिलर कोण?
जेसन मिलर यांना अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचा ‘मेंदू’ असे संबोधिले जाते. 2016 आणि 2020 च्या निवडणूक प्रचारमोहिमेत ते ट्रम्प यांचे व्यूहनीतिकार राहिले आहेत. मिलर अमेरिकेत भारतासाठी कूटनीति, जनसंपर्क आणि धोरणनिर्मितीत सहाय्य करतील. ट्रम्प यांचा दृष्टीकोन आणि विचारांबद्दल मिलर यांना चांगली कल्पना असल्यानेच आणि वॉशिंग्टनच्या सतावर्तुळात त्यांची पोहोच असल्यानेच भारताने त्यांची निवड केली आहे. काश्मीरप्रकरणी अमेरिकेत भारताची बाजू मजबूतपणे मांडणे आणि व्यापार कराराकरता अनुकूल वातावरण तयार करण्याचा उद्देश मिलर यांच्या नियुक्तीमागे आहे. ट्रम्प यांच्यापर्यंत आयातशुल्कावरून भारताच्या तक्रारी त्यांनी पोहोचविल्याचे संकेत मिळत आहेत. ट्रम्प यांची अलिकडची वक्तव्यं पाहता ते भारतासोबत तोडगा काढण्यास तयार असल्याचे स्पष्ट होत आहे.









