12 वर्ष व 18 मालिकाविजयानंतर मायदेशात गमावली पहिली मालिका : फिरकीपटू मिचेल सँटनर सामनावीर
सुकृत मोकाशी/ पुणे
न्यूझीलंडने पुण्यात भारताचे पानिपत करत सलग दुसऱ्या कसोटी सामन्यात दारुण पराभव केला. या पराभवासह भारतीय संघाला 12 वर्ष व 18 मालिकाविजयानंतर प्रथमच मायदेशात कसोटी मालिका गमवावी लागली आहे. याआधी भारताने 2012 मध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटची कसोटी मालिका गमावली होती. पुण्यातील सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघाला 359 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात भारतीय संघाला 245 धावांपर्यंत मजल मारता आली. किवी संघाने 113 धावांनी विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. संपूर्ण सामन्यात 13 बळी मिळवणाऱ्या किवीज फिरकीपटू मिचेल सँटनरला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. 
पुणे कसोटीतील पराभवासह भारतीय संघाने मालिकाही गमावली आहे. तर न्यूझीलंडचा संघ भारतीय भूमीवर प्रथमच कसोटी मालिका जिंकण्यात यशस्वी ठरला. या मालिकेतील पहिला कसोटी सामना बेंगळूर येथे खेळला गेला होता. या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा 8 विकेटनं पराभव झाला होता. आता किवी संघाने पुणे कसोटीही जिंकून इतिहास रचला आहे. आता, उभय संघातील तिसरा व शेवटचा सामना दि. 1 नोव्हेंबरपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
पुणे कसोटीत न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या किवी संघाने 259 धावा केल्या. यानंतर प्रत्युत्तरात पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेली टीम इंडिया अवघ्या 156 धावांत गारद झाली. यादरम्यान रवींद्र जडेजाने 38 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. इतर फलंदाज मात्र सपशेल अपयशी ठरले. पहिल्या डावात 103 धावांची आघाडी घेत किवी संघाने दुसऱ्या डावात 255 धावा केल्या. तिसऱ्या दिवशी 5 बाद 198 धावसंख्येवरुन पुढे खेळण्यास सुरुवात केल्यानंतर 57 धावांत किवी संघाने आपले पाच गडी गमावले. त्यांचा दुसरा डाव 69.4 षटकांत 255 धावांवर आटोपला. लॅथमने सर्वाधिक 86 धावा केल्या तर ग्लेन फिलिप्सने 48 तर ब्लंडेलने 41 धावांचे योगदान दिले. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने 4, जडेजाने 3 तर अश्विनने 1 बळी घेतला.

सँटनरसमोर भारतीय फलंदाजांचे लोटांगण
न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या डावात 255 धावांवर सर्वबाद झाला व टीम इंडियाला विजयासाठी 359 धावांचे टार्गेट मिळाले. एमसीएच्या फिरकीला साथ देणाऱ्या या खेळपट्टीवर रोहित शर्मा व यशस्वी जैस्वाल यांनी वेगवान सुरुवात केली. यशस्वी जैस्वालने पहिल्याच षटकात 16 धावा केल्या. पण रोहित शर्माने नांगी टाकली. तो पुन्हा एकदा मिशेल सँटनरच्या गोलंदाजीवर केवळ 8 धावा करून स्वस्तात बाद झाला. यानंतर जैस्वालने शुभमन गिलच्या साथीने अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. लंचनंतर मात्र गिलला सँटनरने बाद करत ही जोडी फोडली. गिल 23 धावा काढून माघारी परतला. दुसरीकडे, जैस्वालने मात्र आक्रमक खेळताना 65 चेंडूत 9 चौकार व 3 षटकारासह सर्वाधिक 77 धावा केल्या. जैस्वालचा अडथळा सँटनरने दूर केला. यानंतर आलेल्या ऋषभ पंतला भोपळाही फोडता आला नाही तर स्टार फलंदाज विराट कोहलीही (17) पुन्हा एकदा अपयशी ठरला.
विराट बाद झाल्यानंतर सँटनरची जादू पुन्हा एकदा कामी आली आणि त्याने सरफराज खानला (9) क्लीन बोल्ड केले. भारताची सातवी विकेट वॉशिंग्टन सुंदरच्या (21) रूपाने बाद पडली. जो ग्लेन फिलिप्सच्या चेंडूवर शॉर्ट लेगवर विल यंगच्या हाती झेलबाद झाला. यानंतर जडेजा आणि अश्विनने भारतीय डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला, मात्र 206 धावांवर अश्विन (18) मिचेल सँटनरचा बळी ठरला. जडेजाने 2 चौकारासह 42 धावा केल्या. आकाशदीपला एजाज पटेलने तंबूचा रस्ता दाखवला. सँटनर (104 धावांत 6 बळी) व एजाज पटेल व ग्लेन फिलिप्स यांच्या भेदक माऱ्यासमोर टीम इंडियाचा दुसरा डाव 245 धावांवर संपला.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड पहिला डाव 259 व दुसरा डाव 255
भारत पहिला डाव 156 व दुसरा डाव 69,4 षटकांत सर्वबाद 245 (जैस्वाल 77, गिल 23, विराट 17, सुंदर 21, जडेजा 42, अश्विन 18, बुमराह नाबाद 10, सँटनर 6 बळी, एजाज पटेल 2 व फिलीप्स 1 बळी).
12 वर्षानंतर मायदेशात टीम इंडियावर मालिका गमावण्याची वेळ
भारतीय संघाने तब्बल 12 वर्षांनंतर मायदेशात कसोटी मालिका गमावली आहे. यासह घरच्या भूमीवर सलग 18 कसोटी मालिका जिंकल्यानंतर विजयी मालिका खंडित झाली. यापूर्वी टीम इंडियाला 2012-13 मध्ये चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने 2-1 ने पराभूत केले होते. त्यानंतर भारताने सलग 18 मालिका जिंकल्या. मात्र, आता न्यूझीलंडने टीम इंडियाला पराभूत करून ही विजयाची मालिका खंडित केली आहे. किवी संघ भारतीय भूमीवर एवढी प्रभावी कामगिरी करेल, असे कुणालाही वाटले नव्हते. बेंगळूर येथील पहिली कसोटी जिंकून न्यूझीलंडने 36 वर्षांनंतर भारतात कसोटी सामना जिंकला होता. आता प्रथमच त्यांनी भारतात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे.
जैस्वालचा कसोटीत आणखी एक कारनामा
यशस्वी जैस्वालने न्यूझीलंडविरुद्ध पुणे कसोटी सामन्याच्या शेवटच्या डावात 65 चेंडूत 77 धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने मायदेशात 2024 या वर्षात 1000 धावाही पूर्ण केल्या. भारतीय संघाकडून कसोटी क्रिकेटमध्ये घरच्या मैदानावर एका वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आता यशस्वी जैस्वालच्या नावे जमा झाला आहे. याआधी हा विक्रम गुंडप्पा विश्वनाथ यांच्या नावावर होता, त्यांनी 1979 मध्ये घरच्या मैदानावर 13 कसोटीत 1047 धावा केल्या होत्या. जैस्वालने यंदाच्या वर्षात आतापर्यंत 9 कसोटीत 1056 धावा केल्या आहेत.
भारतासाठी एका वर्षात घरच्या मैदानावर सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
यशस्वी जैस्वाल – 1056 धावा (2024)
गुंडप्पा विश्वनाथ – 1047 धावा (1979)
विराट कोहली – 964 धावा (2016)
विराट कोहली – 898 धावा (2017).
टीम इंडियाचे अव्वलस्थान धोक्यात
न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या व दुसऱ्या कसोटीत दारुण पराभव स्वीकारावा लागल्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत टीम इंडियाचे अव्वलस्थान धोक्यात आले आहे. न्यूझीलंडविरुद्ध सलग दोन पराभवानंतरही भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. पण दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील अंतर फार कमी आहे. पुणे कसोटीपूर्वी भारतीय संघ 68.06 पीसीटीसह अव्वल होता, पण भारताचा पीसीटी 62.82 झाला आहे. ऑस्ट्रेलिया 62.50 पीसीटीसह ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे. सलग दोन विजयासह किवीज संघ चौथ्या स्थानी पोहोचला आहे. श्रीलंकन संघ तिसऱ्या स्थानी कायम असून द.आफ्रिका पाचव्या, इंग्लंड सहाव्या स्थानी आहे. पुणे कसोटीनंतर भारताला किवी संघाविरुद्ध एक कसोटी आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 कसोटी सामने खेळायचे आहेत. अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला न्यूझीलंडविरुद्धचा तिसरा कसोटी सामना जिंकावा लागेल आणि बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाचा 3-2 असा पराभवही करावा लागेल. तसे झाले नाही तर भारताला अंतिम फेरी गाठणे कठीण होऊ शकते.
फिरकीपटू सँटनर ठरला न्यूझीलंडच्या विजयाचा हिरो
बेंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर न्यूझीलंडने टीम इंडियाला पहिला दणका दिला. यानंतर फिरकीला अनुकूल असणाऱ्या पुण्याच्या खेळपट्टीवर टीम इंडिया मालिकेत बरोबरी साधेल अशी अपेक्षा होती. पण, भारताचे कागदी शेर किवी फिरकीपटू मिचेल सँटनरसमोर सपशेल ढेर ठरले. सँटनने दोन्ही डावात 13 बळी किवीज संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.









