वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकेतील डल्लास येथे एक मॉलमध्ये रविवारी झालेल्या गोळीबारात ऐश्वर्या नामक भारतीय महिलेचा मृत्यू झाला आहे. शहरातील अॅलन प्रिमियम आऊटलेट मॉल येथे ही गोळीबाराची घटना घडली होती. या गोळीबारात 8 जणांचा बळी गेला होता. ऐश्वर्या थाटीकोंडा या तेलंगणातील जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांच्या कन्या आहेत. त्या इंजिनिअर असून अमेरिकेत कामासाठी गेलेल्या होत्या. मॉलमध्ये खरेदी करत असताना त्यांना गोळी लागली होती.
त्यांचे पिता थाटीकोंडा नरसीरेड्डी हे सध्या रंगारेड्डी जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम पहात आहेत. गोळीबार झाला तेव्हा ऐश्वर्या आपल्या काही मैत्रिणींसह मॉलमध्ये खरेदीसाठी गेलेल्या होत्या. काही अज्ञात बंदुकधाऱ्याने मॉलमध्ये घुसून अंदाधुंद गोळीबार केला.
हल्लेखोर ठार
हल्लेखोराचे नाव मॉरिसिओ गार्सिया असे असून त्याला मॉलच्या सुरक्षारक्षकांनी गोळ्या घालून ठार केले. त्यामुळे अनेक लोकांचे प्राण वाचले. अन्यथा मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती, अशी माहिती देण्यात आली आहे. गार्सिया याच्या गोळीबारात 7 लोक जखमीही झाले असून ऐश्वर्या यांच्या मैत्रिणीचा जखमींमध्ये समावेश आहे. जखमींपैकी 3 जणांची स्थिती गंभीर असून त्यांच्यावर ऊग्णालयात उपचार होत आहेत, अशी माहिती डल्लास येथील पोलिसांनी दिली.









