वृत्तसंस्था/ बुसान (दक्षिण कोरिया)
येथे सुरू असलेल्या 2023 च्या आशियाई कबड्डी पुरुषांच्या चॅम्पियनशिप स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यात भारताने जपानचा 62-17 अशा गुणांनी एकतर्फी पराभव करून आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. या स्पर्धेतील भारताचा हा सलग तिसरा विजय आहे.
या स्पर्धेतील सामन्यात भारतीय संघातील अस्लम इनामदारने दर्जेदार खेळाचे प्रदर्शन घडवले. या स्पर्धेत दुसऱ्यांदा सुपर 10 गुणांची नोंद केली. कोरियाविरुद्धच्या सामन्यात अस्लम इनामदारने सर्वाधिक गुण नोंदवले. परवेश बन्सिवालने बचावाची फळी भक्कम राखली होती. या सामन्यापूर्वी भारत आणि जपान यांनी प्रत्येकी दोन सामने जिंकले होते. जपानने या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात हाँगकाँगचा 85-11 असा पराभव केला होता. तर कोरियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्यांनी 45-18 असा विजय मिळवला होता. भारतीय कब•ाr संघाने या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात कोरियाचा 76-13 अशा गुणांनी पराभव केला तर दुसऱ्या सामन्यात भारताने चीन तैपेईचे आव्हान 53-19 असे संपुष्टात आणले होते.
भारत आणि जपान यांच्यातील सामन्यात भारताने पूर्वार्धात तीनवेळा तर उत्तरार्धात तीनवेळा जपानचे सर्व गडी बाद केले. विद्यमान विजेत्या भारताने चौथ्याच मिनिटाला जपानचे सर्व गडी बाद करून 18-0 अशी आघाडी मिळवली होती. सामन्यातील 8 व्या मिनिटाला जपानला काही गुण मिळवता आले. मध्यंतरापर्यंत भारताने जपानवर 32-6 अशी आघाडी मिळवली होती. भारतीय संघातर्फे कर्णधार पवन सेहरावत हा सर्वोत्तम चढाईपटू ठरला. त्याने पूर्वार्धात 6 गुण मिळवले. भारताने उत्तरार्धात 30 गुण मिळवून हा सामना 45 गुणफरकाने जिंकला. आता या स्पर्धेत गुरुवारी भारताचा महत्त्वाचा सामना बलाढ्या इराणबरोबर होणार आहे. इराणच्या कब•ाr संघाने या स्पर्धेत अद्याप एकही सामना गमवलेला नाही. या स्पर्धेमध्ये इराण, भारत, जपान, कोरिया, चीन तैपेई आणि हाँगकाँग या सहा संघांचा समावेश असून येत्या शुक्रवारी स्पर्धेतील अंतिम सामना खेळवला जाईल. सदर स्पर्धा सिंगल लेग राऊंड रॉबिन पद्धतीची खेळवली जात असून आघाडीचे दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील.









