वृत्तसंस्था /नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनची आगामी कनिष्ठ महिलांची विश्वचषक हॉकी स्पर्धा चिलीमध्ये होणार आहे. या स्पर्धेच्या पूर्वतयारीकरिता हॉकी इंडियाने भारतीय महिला हॉकी संघासाठी अर्जेंटिनाचा दौरा आयोजित केला आहे. या दौऱ्यामध्ये भारतीय संघाला सराव आणि प्रशिक्षण त्याचप्रमाणे काही सरावाचे सामनेही खेळावे लागणार आहेत. भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघ प्रमुख प्रशिक्षक तुषार खांडेकरसमवेत अर्जेंटिनाला रवाना होणार आहे. अर्जेंटिना दौऱ्यासाठी हॉकी इंडियाने भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघाची निवड केली आहे. चिलीतील विश्वचषक कनिष्ठांची हॉकी स्पर्धा 29 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर दरम्यान सँटीयागो येथे खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत भारताचा क गटात समावेश करण्यात आला आहे. या गटात जर्मनी, बेल्जियम आणि कॅनडा यांचा सहभाग आहे. भारतीय महिला हॉकी संघांचा या स्पर्धेतील सलामीचा सामना 29 नोव्हेंबरला कॅनडाबरोबर तर 30 नोव्हेंबरला जर्मनी आणि 2 डिसेंबरला बेल्जियमबरोबर होणार आहे. या स्पर्धेत अ गटात नेदरलँड्स, द. आफ्रिका, ऑस्ट्रेलिया व यजमान चिली, ब गटात अर्जेंटिना, स्पेन, झिंबाब्वे व कोरिया तर ड गटात इंग्लंड, अमेरिका, न्यूझीलंड व जपान यांचा समावेश आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना 10 डिसेंबरला खेळवला जाईल.









