वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मलेशियात होणाऱ्या सुलतान जोहोर चषक हॉकी स्पर्धेसाठी हॉकी इंडियाने सोमवारी 19 सदस्यीय कनिष्ठ हॉकी संघाची घोषणा केली असून डिफेंडर रोहितकडे या संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. 11 ऑक्टोबरपासून स्पर्धेला सुरुवात होईल.
या संघात गोलरक्षक बिक्रमजित सिंग, प्रिन्सदीप सिंग, डिफेंडर्स रोहित, तालेम प्रियोबार्टा, अनमोल एक्का, अमिर अली, सुनील पीबी, रवनीत सिंग, मिडफिल्डर्स अंकित पाल, थौनाओजम इन्गलेम्बा लुवांग, अॅड्रॉहित एक्का, अरायजीत सिंग हुंदाल, रोशन कुजुर, मनमीत सिंग आणि आघाडीवीर अर्शदीप सिंग, सौरभ आनंद कुशवाहा, अजीत यादव, गुरजोत सिंग यांचा समावेश आहे. विवेक लाक्रा, शारदानंद तिवारी, थॉकचोम किंग्सन सिंग, रोहित कुल्लू व दिलराज सिंग यांची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.
‘सुलतान जोहोर चषक हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघ जोरदार तयारी करीत आहे. आपला एक उत्तम संघ असून ज्युनियर वर्ल्ड कपच्या दृष्टिकोनातून ही स्पर्धा त्यासाठी उत्तम व्यासपीठ ठरणार आहे. बलवान संघांविरुद्ध आपल्या क्षमतेला आजमावून पाहण्याची संधीही खेळाडूंना मिळणार आहे तर महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय अनुभवही मिळणार आहे. मलेशियातील या स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करण्याची आम्ही आतुरतेने प्रतीक्षा करीत आहोत,’ असे या कनिष्ठ संघाचे प्रशिक्षक पीआर श्रीजेश म्हणाले.
भारताने मागील आवृत्तीमध्ये कांस्यपदक मिळविले होते, यातून प्रेरणा घेत यावर्षी आणखी सुधारीत कामगिरी करण्याचा प्रयत्न करतील. भारताची सलामीची लढत 11 ऑक्टोबर रोजी ग्रेट ब्रिटनविरुद्ध होईल. त्यानंतर 12 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड, 14 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान, 15 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया आणि 17 ऑक्टोबर रोजी यजमान मलेशियाविरुद्ध राऊंड रॉबिनमधील शेवटचा सामना होईल. या फेरीनंतर अव्वल दोन स्थाने मिळविणाऱ्या संघांत 18 ऑक्टोबर रोजी अंतिम लढत होईल.









