वृत्तसंस्था/ बेंगळूर
11 व्या सुलतान जोहोर चषक हॉकी स्पर्धेसाठी हॉकी इंडियाने सोमवारी 20 सदस्यीय कनिष्ठ हॉकी संघाची घोषणा केली. ऑक्टोबर 27 ते 4 नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा जोहोर, मलेशिया येथे होणार आहे.
याआधीच्या स्पर्धेत सहा संघांचा सहभाग होता पण यावेळी त्यात एकूण आठ संघ सहभागी होणार आहेत. भारताचा ब गटात समावेश असून याच गटात मलेशिया, पाकिस्तान, न्यूझीलंड यांचा तर अ गटात जर्मनी, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका व ग्रेट ब्रिटन यांचा समावेश आहे. भारतीय संघाचा कर्णधार उत्तम सिंग असून राजिंदर सिंग उपकर्णधार असेल. उपांत्य फेरी गाठण्यासाठी गटात पहिल्या दोन संघांत स्थान मिळविणे आवश्यक असेल.
या स्पर्धेबद्दल बोलताना भारताच्या कनिष्ठ हॉकी संघाचे प्रशिक्षक सीआर कुमार म्हणाले की, ‘निवड समितीने याआधीच्या सर्व स्पर्धांचा विचार करून समतोल संघ निवडला आहे. हा संघ सुलतान जोहोर चषक स्पर्धेत यशस्वी ठरेल, असा विश्वास वाटतो,’ असे ते म्हणाले. ‘उत्तम व प्रभावी पासेस देऊ शकणारे आणि प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकणाऱ्या खेळाडूंना जास्त प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच या स्पर्धेतून अन्य संघांच्या ताकदीचा अंदाज घेण्याची संधीही मिळणार आहे. कारण हेच संघ येत्या डिसेंबरमध्ये होणाऱ्या कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा कौलालंपूरमध्येच होणार असल्याने त्यासारखेच वातावरणा जोहोरमध्येही असून त्याची सवयही खेळाडूंना होणार आहे,’ असेही ते म्हणाले.
गोलरक्षणाची जबाबदारी मोहित एचएस, रणविजय सिंग यादव यांच्याकडे असेल तर अमनदीप लाक्रा, रोहित, सुनील जोजो, सुखविंदर, अमिर अली, योगेम्बर रावत हे बचावफळी सांभाळणार आहेत. या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेला संघ पुढीलप्रमाणे आहे. गोलरक्षक : मोहित एचएस, रणविजय सिंग यादव. बचावफळी : अमनदीप लाक्रा, रोहित, सुनील जोजो, सुखविंदर, अमिर अली, योगेम्बर रावत. मध्यफळी : विष्णुकांत सिंग, पूवान्ना सीबी, राजिंदर सिंग, अमनदीप, सुनीत लाक्रा, अब्दुल आहद. आघाडी फळी : उत्तम सिंग, अरुण सहानी, आदित्य लाळगे, अंगद बिर सिंग, गुरजोत सिंग, सतीश बी.









