वृत्तसंस्था /कौलांलपूर (मलेशिया)
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या कनिष्ठ पुरूष विश्व चषक हॉकी स्पर्धेतील गुरुवारी खेळविण्यात आलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात जर्मनीने भारताचा 4-1 अशा गोल फरकाने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. या सामन्यात भारतीय संघाचा खेळ निराशजनक झाला आणि त्यांना पेनल्टी कॉर्नरचा लाभ उठविता आला नाही. बलाढ्या जर्मनीने आतापर्यंत ही स्पर्धा सहा वेळा जिंकली आहे. गुरुवारच्या उपांत्य सामन्यात भारताला 12 पेनल्टी कॉर्नर्स तर जर्मनीला 2 पेनल्टी कॉर्नर्स मिळाले होते. भारतीय खेळाडूंना एकाही कॉर्नरवर गोल नोंदविता आला नाही. तर जर्मनीने दोन्ही कॉर्नर्सवर आपले गोल केले. या स्पर्धेत भारतीय कनिष्ठ हॉकी संघाने गेल्या मंगळवारी झालेल्या उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात बलाढ्या नेदरलँडस्चा 4-3 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली होती. नेदरलँडसचा संघ हॉकी मानांकनात चौथ्या स्थानावर आहे. गुरुवारच्या सामन्यात भारतीय खेळाडूंना पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदविता आला नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल.
गुरुवारच्या उपांत्य सामन्यात 8 व्या मिनिटाला जर्मनीचे खाते बेन हेसबॅश्चने मैदानी गोलवर उघडले. त्यानंतर हेसबॅश्चने पेनल्टी कॉर्नरवर 30 व्या मिनिटाला संघाचा आणि वैयक्तिक दुसरा गोल केला. मध्यंतराला केवळ कांही मिनिटे बाकी असताना भारताचा एकमेव गोल सुदीप चिर्रकोने केला. मध्यंत्तरापर्यंत जर्मनीने भारतावर 2-1 अशी आघाडी घेतली होती. 41 व्या मिनिटाला ग्लेंडर पॉलने पेनल्टी स्ट्रोकवर जर्मनीचा तिसरा तर फ्लोरेन स्पर्लींगने 58 व्या मिनिटाला मैदानी गोल करून भारताचा आव्हान संपुष्टात आणले. आता या स्पर्धेत भारताचा कास्य पदकांसाठीचा सामना शनिवारी खेळविला जाणार आहे. फ्रान्स आणि स्पेन यांच्यात दुसरा उपांत्य सामना होणार असून या सामन्यातील विजयी संघाबरोबर जर्मनीची जेतेपदासाठी लढत होईल. 2021 साली झालेल्या या स्पर्धेत भारताला जर्मनीने 2-4 अशा गोलफरकाने पराभूत केले होते.









