वृत्तसंस्था/ सिडनी
विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या जेतेपदापासून आणि जागतिक फुटबॉलमधील जेतेपदाच्या बाबतीत 57 वर्षांचा दुष्काळ संपुष्टात आणण्यापासून इंग्लंड आता केवळ एक सामना दूर आहे. विश्वचषक 1966 नंतर प्रथमच उद्या रविवारी फुटबॉलच्या जन्मस्थानी परत येऊ शकतो. परंतु हा विश्वचषक पुऊष फुटबॉलपटूंनी नव्हे, तर महिलांच्या राष्ट्रीय संघाने सोबत आणलेला असेल. इंग्लंड प्रथमच महिलांच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलेला असून रविवारी त्यांची गांठ स्पेनशी पडणार आहे.

2003 मध्ये जर्मनीने स्वीडनला हरवल्यानंतरची ही पहिलीच ‘ऑल-युरोपियन फायनल’ आहे. दोन्ही संघांसाठी हा एक जादुई प्रवास राहिलेला आहे. गेल्या उन्हाळ्यात युरोपियन स्पर्धा जिंकल्यापासून इंग्लंड जागतिक स्तरावर अव्वल राहिलेला आहे. दुसरीकडे, स्पेन 15 खेळाडूंनी निषेधार्थ संघ सोडल्यानंतर एका वर्षापेक्षा कमी कालावधीत भरारी घेऊन पहिल्यांदाच विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलेला आहे. परंतु इंग्लंडने अंतिम फेरीत पोहोचणे अपेक्षित होते आणि जगभरातील इंग्लंडचे समर्थक विश्वचषक यावेळी इंग्लंडमध्ये येईल अशी अपेक्षा बाळगून आहेत.

इंग्लिश फुटबॉल संघाने 1966 पासून विश्वचषक जिंकलेला नाही. त्या वर्षी पुऊषांचा संघ विजेता ठरला होता आणि रविवारी होणार असलेला सामना हा इंग्लंडचा मागील 57 वर्षांतील विश्वचषकाचा पहिला अंतिम सामना आहे. इंग्लंडच्या पुनरागमनाचे नेतृत्व प्रशिक्षक सरिना विग्मन यांनी केले आहे. त्यांना 2021 च्या उत्तरार्धात संघाच्या पहिल्या बिगरब्रिटिश प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. विगमन या स्पर्धेच्या इतिहासातील दोन राष्ट्रांच्या संघांना अंतिम फेरीपर्यंत पोहोचविणाऱ्या एकमेव प्रशिक्षिका आहेत.
गेल्या वर्षी पहिल्यांदाच युरोपियन स्पर्धेचे जेतेपद मिळविल्यानंतर आता विग्मन इंग्लंडला दुसरा मोठा चषक जिंकून देण्यास सज्ज झाल्या आहेत. इंग्लंडने उपांत्य फेरीत यजमान ऑस्ट्रेलियावर 3-1 असा विजय मिळवला. त्यात त्यांची आघाडीची स्कोअरर लॉरेन जेम्स खेळली नव्हती. बाद फेरीत नायजेरियन खेळाडूला पाडल्यास्तव तिला कोलंबिया आणि ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या सामन्यासाठी निलंबित करण्यात आले होते. या विश्वचषकात या 21 वर्षीय खेळाडूने तीन गोल केले असून तीन गोलांसाठी साहाय्य केलेले आहे.
दुसरीकडे, स्पेनने अनेक खेळाडूंनी जवळपास बंड करूनही अंतिम फेरी गाठताना अनेकांचे अंदाज चुकविले आहेत. ज्या 15 खेळाडूंनी मानसिक आरोग्याच्या चिंतेमुळे राष्ट्रीय संघ सोडला होता त्यापैकी तीन खेळाडू-मिडफिल्डर ऐताना बोनमाटी, फॉरवर्ड मारियोना कॅल्डेन्ते आणि बचावपटू ओना बॅटले या महासंघाशी समेट करून विश्वचषक स्पर्धेसाठी परतल्या. स्पेनने मंगळवारी स्वीडनवर 2-1 असा विजय मिळवत अंतिम फेरीत स्थान मिळवले. शुक्रवारी सराव सुरू असताना त्यांच्या 19 वर्षीय पॅरालुएलोच्या डाव्या पायात पेटके आल्याचे दिसल्याने तिच्यावर उपचार करण्यात आले. आघाडीपटू अल्बा रेडोंडो देखील अनुपस्थित होती. स्वीडनविऊद्ध विजयी गोल करण्याबरोबरच पॅरालुएलोने उपांत्यपूर्व फेरीत नेदरलँड्सवर अतिरिक्त वेळेत विजयी गोल केला होता.
2022 च्या युरोपियन स्पर्धेपूर्वी स्नायूला दुखापत झालेल्या आणि दोन वेळा बॅलोन डी’ओर पुरस्कार प्राप्त झालेल्या अॅलेक्सिया पुटेलासकडून स्पर्धेत सातत्यपूर्ण खेळ झालेला नाही. पण बोनमतीचे प्लेमेकिंग तिची उणीव भरून काढण्याच्या बाबतीत मदत करून गेलेले आहे. 2010 मध्ये स्पेनच्या पुऊष संघाने विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर आता त्यांच्या महिलांना विश्वचषक जिंकण्याची संधी आहे. स्पेनच्या महिला संघाला कधीही मोठी स्पर्धा जिंकता आलेली नाही.









