वृत्तसंस्था / डसेलडॉर्फ (जर्मनी)
भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी संघाने शुक्रवारी येथे स्पेनवर 6-2 असा रोमहर्षक विजय मिळवून चार राष्ट्रांच्या स्पर्धेतील आपल्या मोहिमेची सुरु वात दणदणीत पद्धतीने केली. रोहित व सुदीप चिरमाको यांनी प्रत्येकी दोन गोल केले, तर अमनदीप लाक्रा आणि बॉबी सिंग धामी यांनी भारतासाठी प्रत्येकी एक गोल केला.
निकोलस अल्वारेझ (पहिल्या मिनिटाला) आणि गुई कोरोमिनास (23 व्या मिनिटाला) यांनी स्पेनकडून गोल केले. स्पेनने सामन्याला दमदार पद्धतीने सुऊवात केली आणि पहिल्याच मिनिटाला अल्वारेझने गोल करून भारतावर दडपण आणले. त्यानंतर भारतीयांनी एकत्रितपणे भरपूर हल्ले करणे चालू ठेवले, परंतु स्पेनने पहिल्या सत्रात आपली आघाडी कायम राखण्याच्या दृष्टीने चांगला बचाव केला. भारताने दुसऱ्या सत्रामध्ये लवकर बरोबरी साधण्याचा त्यांचा इरादा दाखवला, पण कोरोमिनासने आणखी एक गोल करून स्पेनची आघाडी दुप्पट केली.
दोन मिनिटांनंतर लाक्राने पेनल्टी कॉर्नरवर भारताचा पहिला गोल केला, तर रोहितने 28 व्या मिनिटाला त्यात भर घालून मध्यांतराच्या वेळी संघाला बरोबरीत आणले. मध्यांतरानंतर भारत आणि स्पेन या दोन्ही देशांनी गोल नोंदविण्याकरिता कंबर कसली. पण 35 व्या मिनिटाला चिरमाकोने गोल करून भारताला प्रथमच आघाडीवर नेले. तिसरे सत्र संपले त्यावेळी रोहितने पेनल्टी कॉर्नरवर गोल केल्याने भारताने आघाडी वाढवली होती.
दोन गोलांनी पिछाडीवर पडलेल्या स्पेनने भारतीय क्षेत्रात प्रवेश करण्याच्या शोधात आक्रमक चाली सुरू केल्या. पण धामीने 53 व्या मिनिटाला गोल करत स्पेनच्या प्रतिकाराला धक्का पोहोचविला आणि भारताची आघाडी आणखी मजबूत केली. सामना संपण्यास दोन मिनिटे असताना चिरमाकोने पुन्हा लक्ष्य साधत भारताला 6-2 असा सहज विजय मिळवून दिला. भारताचा पुढील सामना आज शनिवारी यजमान जर्मनीशी होणार आहे.









