वृत्तसंस्था/सिंगापूर
भारताच्या कनिष्ठ तिरंदाजांनी आपले वर्चस्व कायम ठेवताना येथे सुरू असलेल्या आशिया चषक स्टेज 2 तिरंदाजी स्पर्धेत पाच संघांनी अंतिम फेरी गाठली. भारताच्या रिकर्व्ह पुरुष संघाने बांगलादेशचा 5-1 असा एकतर्फी पराभव करून अंतिम फेरीत स्थान मिळविले. दुसरे मानांकन असलेल्या भारताची अंतिम लढत तिसऱ्या मानांकित जपानशी होणार आहे. विष्णू चौधरी, पारस हुडा व जुयल सरकार यांनी यांनी प्रारंभापासूनच या लढतीत वर्चस्व गाजवत पहिला सेट त्यांनी 55-48 असा घेतला. दुसरा सेट 55-55 असा टाय झाला असला तरी भारताने मुसंडी मारत पाचव्या मानांकन असलेल्या बांगलादेशला नमविले. तिसऱ्या सेटमध्ये भारताने केवळ एक गुण गमवित 59-56 असा विजय मिळविला.
रिकर्व्ह मिश्र सांघिक तिरंदाजीत वैष्णवी पवार, विष्णू चौधरी यांनी सिंगापूरच्या तबिथा एम लिन येओ व युइ लाँग ली यांच्यावर 5-3 अशी मात करून अंतिम फेरीत स्थान मिळविले. भारतीय जोडीने पहिला सेट 37-35 असा जिंकला, दुसरा सेट 37-37 असा टाय झाला तर तिसरा सेट 36-38 असा गमविल्याने 3-3 अशी बरोबरी झाली. पण पवार व चौधरी यांनी संयमी खेळ करीत शेवटचा सेट 38-34 असा जिंकत आगेकूच केली.
पुरुषांच्या सांघिक कंपाऊंडमध्ये कुशल दलाल, गणेश थिरुमुरू व मिहिर अपार यांनी पाचव्या मानांकित ऑस्ट्रेलियन त्रिकुटाचा शूटऑफमध्ये 30-29 असा पराभव केला. कझाकविरुद्ध भारताची अंतिम लढत होईल. अग्रमानांकन मिळालेल्या भारताच्या महिला कंपाऊंड संघात षन्मुखी बुद्दे, तेजल साळवे, तनिष्का ठोकल यांनी चौथ्या मानांकित कझाक संघावर 230-229 अशी अतिशय चुरशीच्या लढतीत पराभव करीत अंतिम फेरी गाठली. मलेशियन संघाविरुद्ध त्यांची जेतेपदाची लढत होईल. मिश्र सांघिक कंपाऊंड विभागात षन्मुखी व कुशल दलाल यांनी अंतिम फेरी गाठताना इंडोनेशियाच्या नुरिसा दायन अश्रिफाह व प्रायमा विस्नू वर्धना यांच्यावर चुरशीच्या लढतीत 155-154 अशी केवळ एका गुणाने मात केली.
भारताच्या महिला रिकर्व्ह संघाला मात्र पराभवाला सामोरे जावे लागले. पाचवे मानांकन असलेल्या भारतीय महिला संघाला उपांत्यपूर्व फेरीत चौथ्या मानांकित जपानकडून 4-5 (26-28) असा शूटऑफमध्ये पराभव पत्करावा लागला. भारतीय संघात पवार, कीर्ती व तमन्ना यांचा समावेश होता. 4-4 अशा बरोबरीनंतर शूटऑफ घेण्यात आले होते. वैयक्तिक विभागातही भारताच्या चार खेळाडूंना पदक जिंकण्याची संधी आहे. महिला कंपाऊंडमध्ये दोन भारतीय अंतिम फेरीत खेळतील, पुरुष कंपाऊंडमध्ये भारताला सुवर्ण व कांस्य पदक जिंकण्याची संधी आहे.









