बेळगावची कन्या रोहिणी पाटील भारतीय महिला संघाची प्रशिक्षिका
बेळगाव : तैवान येथे होणाऱ्या एशियन ज्युडो स्पर्धेसाठी भारतीय ज्युडो संघासमवेत चार प्रशिक्षक तैवानला रवाना झाले आहेत. या संघात बेळगावची सुकन्या रोहिणी पाटील महिला प्रशिक्षक म्हणून राहिल. बेळगावच्या अष्टे-चंदगड गावच्या रोहिणी पाटीलने बेळगावच्या युवजन क्रीडा खात्याच्या ज्युडो विभागात ज्युडो खेळाचे धडे गिरवून अनेक राज्य व राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये भाग घेतला. पुढे तिची याच खेळाच्या प्रशिक्षक क्षेत्रात तिने आपल्या गुरुंच्या आज्ञेनुसार प्रवेश केला. रोहिणी पाटील याच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडूंनी दर्जेदार कामगिरी या क्षेत्रात केली आहे. तिच्या या कामगिरीची दखल घेऊन तैवान येथे होणाऱ्या एशियन राष्ट्रीय ज्युडोसाठी भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे.
गोवा मार्गे भारतीय ज्युडो संघ तैवानला रवाना झाला आहे. या संघात 7 पुरूष व 7 महिलांचा समावेश असून 4 प्रशिक्षकांचा सहभाग आहे. या संघात पुरूष गटात 60 किलो वरील गटात हिमांशू, 66 किलो वजनी गटात करण प्रतासिंग, 73 किलो वजनी गटात हितेशकुमार गुलीया, 81 किलो वजनी गटात आदित्य सोळंकी, 90 किलो गटात निगद जुम शितीलसिंग, 100 किलो गटात क्रिश राखोलीया तर 100 वरील गटात आदित्य परब यांचा समावेश आहे. महिला विभागात 48 किलो वजनी गटात तनू मान, 52 किलो वजनी गटात लिशा अनुतम चानु, 57 किलो वजनी गटात नरूपा, 63 किलो गटात हिमांशी तोकास, 70 किलो गटात तायदू चानू, 78 किलो गटात ईश्रुपा नारंग तर 78 वरील गटात कनवरप्रित कौर यांचा समावेश आहे. तर त्यांच्यासोबत विवेक ठाकूर, गुनामनी मित्ताली, रोहीणी पाटील, अमित वैग्य हे तैवानला रवाना झाले.









