77 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचे संबोधन : राज्यघटना मार्गदर्शक दस्तऐवज
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
सर्व देशवासीय उत्साहात अमृत महोत्सव साजरा करत असून हा दिवस आम्हा सर्वांसाठी गौरवास्पद आणि पावन आहे. चहुबाजूला उत्सवी वातावरण पाहून अत्यंत आनंद होतोय. जात, पंथ, भाषा आणि क्षेत्रासह आमची स्वत:चे कुटुंब अन् कार्यक्षेत्राशी निगडित ओळख देखील असते. परंतु आमची एक ओळख या सर्वांपेक्षा अधिक महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे भारताचा नागरिक असणे आहे, असे उद्गार राष्ट्रपदी द्रौपदी मुर्मू यांनी 77 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करताना काढले आहेत. आम्ही केवळ एक व्यक्ती नसून एका अशा महान जनसमुदायाचा हिस्सा आहोत, जो अत्यंत मोठा अन् जिवंत समुदाय आहे. हा जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या नागरिकांचा समुदाय असल्याचे हा स्वातंत्र्यदिन आम्हाला आठवून देत आहे. वसाहतवादी राजवट संपुष्टात आणण्याचा प्रयत्न याच समुदायाने केला होता. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. आमचा स्वातंत्र्यलढा अद्भूत होता. आमच्या स्वातंत्र्यलढ्यातील मूल्ये सत्य-अहिंसेला पूर्ण जगात स्वीकारण्यात आले. महात्मा गांधी तसेच अन्य महानायकांनी भारताच्या आत्म्याला पुन्हा जागवून आमच्या महान संस्कृतीच्या मूल्यांना लोकांपर्यंत पोहोचविल्याचे राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या.
महिला सशक्तीकरणाला प्राथमिकता देण्याचा आग्रह मी सर्व देशवासीयांना करत आहे. आमच्या बहिणी आणि मुलींनी साहसाने सर्व प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे आणि जीवनात यश मिळवावे. सद्यकाळात महिला सर्व प्रकारच्या क्षेत्रांमध्ये मोठे योगदान देत असून देशाचा गौरव वाढवत आहेत. महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणावर भर दिला जात असल्याचे राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या भारताने जागतिक पटलावर यथोचित स्थान निर्माण केल्याचे आज आम्ही पाहत आहोत. स्वत:च्या दौऱ्यांदरम्यान गौरवाचा नवा भाव मी पाहिला आहे. भारत जगात मानवी मूल्यांना स्थापित करण्यात योगदान देत आहे. भारत पूर्ण जगात, विकासाचे लक्ष्य आणि मानवी सहकार्याला प्रोत्साहन देण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. जी-20 समूह जगातील दोन-तृतीयांश लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतो, याचमुळे हे आमच्यासाठी जागतिक प्राथमिकतांना योग्य दिशेने नेण्यासाठी एक अद्वितीय संधी असल्याचे उद्गार राष्ट्रपतींनी काढले आहेत.
तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था
भारताने आव्हानांना संधींमध्ये रुपांतरित करत प्रभावी जीडीपी वृद्धी देखील नोंदविली आहे. देश सर्व आघाड्यांवर प्रगती करत आहे. जगातील अनेक अर्थव्यवस्था सध्या संकटाला सामोऱ्या जात आहेत. अशा स्थितीत आमचे सरकार प्रतिकूल परिस्थितींचा सामना करण्यास सक्षम राहिले आहे. महागाई चिंतेचा विषय आहे, परंतु आमच्या सरकारने याकरता देखील प्रभावी पावले उचलली आहेत. भारत आज जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरला असून तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याच्या दृष्टीने अग्रेसर आहे. गरजूंना सहाय्य करण्यासाठी अनेक योजना लागू करण्यात आल्या आहेत. मागील दशकात लोकांना दारिद्र्यातून बाहेर काढणे शक्य झाल्याचे राष्ट्रपती मुर्मू यांनी म्हटले आहे.
लाईफस्टाइल फॉर एन्व्हॉयरन्मेंट
हवामान बदलावर आम्ही सर्वांनी लक्ष देणे गरजेचे ठरले आहे. मागील काही वर्षांमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी झाली, तर काही ठिकाणी दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. हा प्रकार जागतिक तापमानवाढीमुळे घडला आहे. भारताने हवामान बदलाचा प्रभाव रोखण्यासाठी लक्षणीय कार्य केले आहे. जगाला आम्ही लाईफस्टाइल फॉर इन्व्हॉयरन्मेंटचा मंत्र दिला आहे. हव्यासाची वृत्ती आम्हाला निसर्गापासून दूर करते. अनेक समुदाय आजही निसर्गाशी आजही एकरुप असल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या.
चांद्रयानाचा उल्लेख
भारतीय अंतराळ संशोधन संस्था यशाची नवी शिखरे गाठत आहे. इस्रोने अलिकडेच चांद्रयान-3 प्रक्षेपित केले असून ते चंद्राच्या कक्षेत दाखल झाले आहे. चांद्रमोहीम अंतराळासाठीच्या आमच्या भाव कार्यक्रमांच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. अंतराळाच्या क्षेत्रात आम्ही बरेच काही साध्य करणार आहोत. संशोधन, नवे तंत्रज्ञान आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी पुढील 5 वर्षांमध्ये 50 हजार कोटी रुपयांच्या निधीसोबत सरकारकडून अनुसंधान नॅशनल रिसर्च फौंडेशन स्थापन करण्यात येणार आहे. हे फौंडेशन आमची महाविद्यालये, विद्यापीठे आणि संशोधन केंद्रांना संशोधन अन् विकासाला आधार प्रदान करणार असल्याचे मुर्मू यांनी नमूद केले आहे.









