वृत्तसंस्था / जोहोर बेहरु (मलेशिया)
शनिवारपासून येथे सुरू झालेल्या सुलतान जोहोर चषक हॉकी स्पर्धेत भारतीय कनिष्ठ पुरूष हॉकी संघाने आपल्या मोहीमेला विजयी सलामीने प्रारंभ केला. भारताने ब्रिटनचा पहिल्या सामन्यात 3-2 अशा गोलफरकाने पराभव केला. मात्र या सामन्यात भारताला विजयासाठी चांगलेच झगडावे लागले.
या सामन्यात भारतातर्फे कर्णधार रोहीतने 45 व्या व 52 व्या मिनिटाला असे दोन गोल केले. तर रवनीत सिंगने 23 व्या मिनिटाला एकमेव गोल नोंदविला. ब्रिटनतर्फे मिचेल रॉयडेनने 26 व्या मिनिटाला तर कॅडेन ड्रेसीने 46 व्या मिनिटाला गोल केले. खेळाला प्रारंभ झाल्यानंतर पहिल्या 13 मिनिटांच्या कालावधीत उभय संघाकडून गोलकोंडी कायम राहिली. दरम्यान भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला.पण ब्रिटनच्या गोलरक्षकाने तो थोपविला. पहिल्या 15 मिनिटांच्या सत्रामध्ये भारतीय खेळाडूंनी आक्रमक चढाया करत ब्रिटनच्या बचावफळीवर चांगलेच दडपण आणले. 16 व्या मिनिटाला भारताला दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण त्याचा लाभ घेता आला नाही. 22 व्या मिनिटाला मनमीत सिंगचा फटका गोलपोस्टच्या बाहेरुन गेल्याने भारताला खाते उघडता आले नाही. पण 23 व्या मिनिटाला गुरूज्योत सिंगने उजव्या बगलेतून चेंडूवर नियंत्रण ठेवत त्याने रवनीत सिंगकडे पास दिला. रवनीत सिंगने या संधीचा फायदा घेत भारताचे खाते उघडले. पण भारताला ती आघाडी अधिक वेळ राखता आली नाही. 26 व्या मिनिटाला कर्णधार मॅक्स अँडर्सनने दिलेल्या पासवर मिचेल रॉयडेनने गोल नोंदवून ब्रिटनला बरोबरी साधून दिली. मध्यंतरावेळी दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते.
खेळाच्या तिसऱ्या 15 मिनिटांच्या कालावधीत भारताचा दुसरा गोल रोहीतने केला. पुढच्याच म्हणजे 46 व्या मिनिटाला कॅडेन ड्रेसेने इंग्लंडचा दुसरा गोल करुन सामन्यात रंगत आणली. 52 व्या मिनिटाला रोहीतने भारताचा तिसरा आणि निर्णायक गोल नोंदवून ब्रिटनचे आव्हान संपुष्टात आणले. या सामन्यात भारतीय हॉकी संघाला 50, 51 आणि 52 व्या मिनिटाला असे तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले. पण पहिले दोन कॉर्नर वाया गेले आणि 52 व्या मिनिटाला मिळालेल्या शेवटच्या कॉर्नरवर रोहीतने संघाचा तिसरा आणि वैयक्तिक दुसरा गोल केला. आता या स्पर्धेत भारतीय कनिष्ठ हॉकी संघाचा पुढील सामना न्यूझीलंडबरोबर रविवारी होणार आहे.









