वृत्तसंस्था / अँटवर्प (बेल्जियम)
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या प्रो लीग युरोपियन टप्प्यात भारताच्या पुरुष आणि महिला हॉकी संघांची पराभवाची मालिका सुरूच आहे. युरोपियन दौऱ्यामध्ये भारतीय पुरूष आणि महिला संघांनी मिळून सलग दहा सामने गमविल्यानंतर आता त्यांचे या दौऱ्यातील शेवटचे दोन सामने बेल्जियमबरोबर होणार आहेत. बेल्जियमबरोबरचा पहिला सामना शनिवारी तर दुसरा सामना रविवारी होईल. या शेवटच्या दोन सामन्यात भारतीय हॉकी संघ विजय मिळवून आपली पराभवाची मालिका खंडीत करणार काय याकडे लक्ष लागले आहे.
प्रो लीग हॉकीच्या युरोपियन टप्प्यामध्ये भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघांना सलग सहा सामन्यात पराभव केल्याने पुढील वर्षी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत थेट प्रवेश मिळविण्याचे प्रयत्न संपुष्टात आले आहे. प्रो लीग हॉकी स्पर्धेतील विजेता संघ आगामी विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी थेट पात्र ठरेल. प्रो लीग हॉकीच्या गुणतक्त्यात भारतीय संघ आठव्या स्थानावर फेकला गेला आहे. या स्पर्धेत एकूण 9 संघांचा समावेश आहे. आगामी विश्वचषक हॉकी स्पर्धा बेल्जियम आणि नेदरलँड्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली आहे.
युरोप दौऱ्याच्या टप्प्यहात नेदरलँड्सने भारताचा पहिल्या सामन्यात 2-1 तर दुसऱ्या सामन्यात 3-2 असा पराभव केला. त्यानंतर अर्जेंटिनाने पहिल्या सामन्यात भारतावर 3-2 तर दुसऱ्या सामन्यात 2-1 अशी मात केली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात भारताचा 3-2 तर दुसऱ्या सामन्यातही 3-2 अशा फरकाने पराभव केला. भारतीय संघातील बचावफळी सामन्यातील शेवटच्या टप्प्यात दडपणाखाली कोलमडल्याने भारताला हे सामने गमवावे लागले. कर्णधार हरमनप्रित सिंग, अमित रोहीदास, सुमित यांचा खेळ निस्तेज झाला.
भारतीय पुरुष हॉकी संघाप्रमाणे महिला संघाची स्थिती फारशी वेगळी झाली नाही. लंडनमध्ये भारतीय महिला हॉकी संघाने सलग चार सामने गमविले आहेत. ऑस्ट्रेलियन महिला संघाने पहिल्या सामन्यात भारताचा 3-2 तर दुसऱ्या सामन्यात 2-1 असा पराभव केला. त्यानंतर अर्जेंटिनाच्या महिला संघाने भारतावर 4-1 अशा पहिल्या सामन्यात तर 2-0 असा दुसऱ्या सामन्यात विजय मिळविला. युरोपीयन टप्पा संपण्यापूर्वी भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघ आपले शेवटचे दोन सामने जिंकण्यासाठी प्रयत्न करतील. भारतीय महिला हॉकी संघाचे बर्लिनमध्ये 28 आणि 29 जून रोजी चीनबरोबर सामने होणार आहेत.









