वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विश्व हॉकी फेडरेशनच्या 2023 साली मलेशियात होणाऱ्या कनिष्ठ पुरूषांच्या विश्व चषक हॉकी स्पर्धेत भारतीय कनिष्ठ पुरूष संघाचा सलामीचा सामना दक्षिण कोरीयाबरोबर 5 डिसेंबरला होणार आहे. या स्पर्धेचा ड्रॉ शनिवारी काढण्यात आला. भारताचा क गटात समावेश आहे.
सदर स्पर्धा मलेशियातील बुक्कीत जलीलच्या नॅशनल हॉकी स्टेडियमवर खेळविली जाणार आहे. पुरूष कनिष्ठांची विश्व चषक हॉकी स्पर्धा 5 ते 16 डिसेंबर दरम्यान होणार आहे. 2021 साली ओडिशातील भुवनेश्वर येथे झालेल्या कनिष्ठ पुरूषांच्या विश्व चषक हॉकी स्पर्धेत भारताला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. मलेशियातील या आगामी स्पर्धेत क गटातील भारताचा सलामीचा सामना दक्षिण कोरीयाबरोबर 5 डिसेंबरला, दुसरा सामना 7 डिसेंबरला स्पेन बरोबर तर तिसरा सामना 9 डिसेंबरला कॅनडा बरोबर होणार आहे.
शनिवारी मलेशियातील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये या स्पर्धेचा ड्रॉ अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत काढण्यात आला. यजमान मलेशिया, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, चिली यांचा अ गटात, जर्मनी, फ्रान्स, दक्षिण आफ्रिका, इजिप्त यांचा ब गटात, भारत, दक्षिण कोरीया, स्पेन, कॅनडा यांचा क गटात तर नेदरलँडस्, बेल्जियम, पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांचा ड गटात समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत भारतीय कनिष्ठ पुरूष संघ निश्चितच दर्जेदार कामगिरी करेल, असा विश्वास उत्तमसिंगने व्यक्त केला आहे. अलिकडच्या कालावधीत भारतीय कनिष्ठ पुरूष हॉकी संघाने सुल्तान जोहोर चषक तसेच कनिष्ठांच्या आशिया चषक स्पर्धेत दर्जेदार कामगिरी केली आहे. 2021 च्या कनिष्ठांच्या विश्व चषक हॉकी स्पर्धेत अर्जेंटिनाने अंतिम सामन्यात बलाढ्या जर्मनीचा पराभव करून सुवर्णपदकासह जेतेपद मिळविले होते. तर या स्पर्धेत फ्रान्सने तिसरे तर भारताने चौथे स्थान घेतले होते.
1979 कनिष्ठ पुरूषांची विश्व चषक हॉकी स्पर्धा पहिल्यांदा भरविली गेली आणि त्यामध्ये 12 संघांचा समावेश होता. यानंतर सहभागी संघांची संख्या वाढली गेली. 2009 साली या स्पर्धेत 20 संघांचा तर 2001 साली झालेल्या या स्पर्धेतील 16 संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेच्या इतिहासात भारतीय संघाने 2001 आणि 2016 साली असे दोन वेळेला अजिंक्यपद मिळविले आहे. ही स्पर्धा दोनवेळा जिंकणारा भारत हा एकमेव देश आहे. त्याचप्रमाणे जर्मनी आणि अर्जेंटिना यांनीही भारताप्रमाणे एकापेक्षा अधिकवेळा ही स्पर्धा जिंकली आहे. मलेशियात होणारी ही विश्व हॉकी फेडरेशनची कनिष्ठ पुरूषांची 13 वी विश्व चषक हॉकी स्पर्धा आहे.









