भारत-फ्रान्स पुरुष हॉकी लढतीतील एक क्षण.
वृत्तसंस्था /व्हॅलेन्सिया (स्पेन)
येथे झालेल्या पाच देशांच्या आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाने एकमेव विजय नोंदवला. या स्पर्धेतील बुधवारी झालेल्या चौथ्या आणि शेवटच्या सामन्यात भारताने फ्रान्सचा 5-4 अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यात कर्णधार हरमनप्रित सिंग आणि जुगराज सिंग यांनी प्रत्येकी दोन गोल नोंदवले. या सामन्यात जुगराज सिंगने 20 व्या आणि 60 व्या मिनिटाला असे दोन गोल केले. तर हरमनप्रित सिंगने 25 व्या आणि 56 व्या मिनिटाला दोन गोल नोंदवले. भारताचा पाच वा गोल विवेकसागर प्रसादने 16 व्या मिनिटाला नोंदवला. या स्पर्धेतील भारतीय संघाची कामगिरी समाधानकारक झाली नाही. भारतीय संघाने यापूर्वीचे आपले तिन्ही सामने गमवले होते. पहिल्या सामन्यात स्पेनने भारताचा 1-0 असा पराभव केला होता. दुसऱ्या सामन्यात बेल्जियमने भारतावर 7-2 अशी मात केली होती. तिसऱ्या सामन्यात जर्मनीने भारताचे आव्हान 3-2 असे संपुष्टात आणले होते.
मानांकनात फ्रान्सचा संघ नवव्या आणि शेवटच्या स्थानावर असून भारत तिसऱ्या स्थानावर आहे. सामन्यातील पहिल्या पंधरा मिनिटांच्या कालावधीत फ्रान्सने आपले खाते उघडले. 11 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर फ्रान्सच्या लुकास माँटेकोटने हा गोल केला. फ्रान्सला या आघाडी अधिक वेळ राखता आली नाही. सामन्याच्या दुसऱ्या 15 मिनिटांच्या कालावधीतील पहिल्याच मिनिटाला विवेकसागर प्रसादने मैदानी गोल करून भारताला बरोबरी राखली. जुगराज सिंगने पेनल्टी कॉर्नरवर 20 व्या मिनिटाला गोल नोंदवून भारताला आघाडीवर नेले. कर्णधार हरमनप्रित सिंगने भारताचा तिसरा गोल नोंदवला. त्याने हा गोल 25 व्या मिनिटाला केला. मध्यंतराला केवळ दोन मिनिटे बाकी असताना फ्रान्सला पेनल्टी स्ट्रोक मिळाला आणि त्यांच्या इटेनी टेनीवेझने या संधीचा पुरेपूर फायदा घेत फ्रान्सचा दुसरा गोल केला. मध्यंतरापर्यंत भारतीय संघ 3-2 असा आघाडीवर होता. सामन्याच्या तिसऱ्या 15 मिनिटांच्या कालावधीला प्रारंभ झाल्यानंतर 43 व्या मिनिटाला फ्रान्सचा तिसरा गोल बॉमगेर्टनने केला. पुन्हा दोन्ही संघ बरोबरीत राहिले. 53 व्या मिनिटाला फ्रान्सला टेनिवेजने आघाडीवर नेले. पेनल्टी कॉर्नवर फ्रान्सचा हा चौथा गोल नोंदवला गेला. 56 व्या मिनिटाला कर्णधार हरमनप्रित सिंगने भारताचा चौथा तर वैयक्तिक दुसरा गोल पेनल्टी कॉर्नवर केला. सामन्याला एक मिनिट बाकी असताना भारताला शेवटचा पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि जुगराज सिंगने पाचवा आणि निर्णायक गोल करून फ्रान्सचे आव्हान संपुष्टात आणले. जुगराज सिंगचा हा दुसरा गोल होता. या स्पर्धेत प्रतिस्पर्धी संघामध्ये एकदा सामना आयोजित केला होता. तसेच या स्पर्धेतील सर्व सामने झाल्यानंतर गुणवारीतील आघाडीचा संघ विजयी म्हणून घोषित केला जाईल.









