वृत्तसंस्था/ सलालह (ओमान)
भारतीय पुरुष हॉकी संघाने शनिवारी येथे खेळवण्यात आलेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पेनल्टी शुटआऊटमध्ये 2-0 असा पराभव करत पहिल्या हॉकी 5 एस आशिया चषक स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले.
या अंतिम सामन्यात निर्धारित वेळेत दोन्ही संघ 4-4 असे गोलबरोबरीत होते. भारतीय हॉकी संघाने पहिली हॉकी 5 एस आशिया चषक स्पर्धा जिंकल्याने आता भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या 2024 साली होणाऱ्या पुरुषांच्या हॉकी 5 एस विश्वचषक स्पर्धेसाठी आपले तिकीट निश्चित केले आहे.
शनिवारच्या अंतिम सामन्यात भारतीय संघातर्फे मोहमद रहीलने 19 व्या आणि 26 व्या मिनिटाला तर जुगराज सिंगने सातव्या तसेच मनिंदर सिंगने 10 व्या मिनिटाला गोल नोंदवले. पाक संघातर्फे अब्दुल रेहमानने 5 व्या मिनिटाला, कर्णधार अब्दुल राणाने 13 व्या, झिक्रिया हयातने 14 व्या तर अर्शद लिकायतने 19 व्या मिनिटाला गोल केले. पेनल्टी शुटआऊटमध्ये भारतातर्फे गुरुज्योत सिंग आणि मनिंदर सिंग यांनी पाकच्या गोलरक्षकाला हुलकावणी देत दोन गोल नोंदवले.
भारतीय गोलरक्षक सुरज कर्केरा याचे गोलरक्षण दर्जेदार आणि भक्कम झाले. कर्केराने पाकचे बरेच हल्ले थोपवले. दरम्यान निर्धारित वेळेतील पाचव्या मिनिटाला पाकच्या रेहमानने कर्केराला हुलकावणी देत पाकचे खाते उघडले. मात्र सातव्या मिनिटाला जुगराज सिंगने भारताला बरोबरी साधून दिली. मनिंदर सिंगने दहाव्या मिनिटाला गोल करून भारताला आघाडीवर नेले. अब्दुल राणाने 13 व्या मिनिटाला तर हयातने 14 व्या मिनिटाला गोल करत आघाडी मिळवली. अर्शद लिकायतने 19 व्या मिनिटाला आपल्या संघाचा चौथा गोल नोंदवला. मोहमद राहिलने काही सेकंदातच भारताचा तिसरा गोल केला. रहिलने 26 व्या मिनिटाला भारताचा पाकशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर दोन्ही संघ निर्धारित वेळेत 4-4 असे बरोबरीत राहिल्याने पंचांनी पेनल्टी शुटआऊटचा अवलंब केला. पाकच्या अर्शद लिकायतने आणि मोहमद मुर्तझा यांचे फटके भारतीय गोलरक्षकाने थोपवले तर गुरुज्योत सिंग आणि मनिंदर सिंग यांनी पाकच्या गोलरक्षकाला हुलकावणी देत दोन गोल नोंदवत आपल्या संघाला ही स्पर्धा जिंकून दिली. सदर स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाला हॉकी इंडियाने प्रत्येक खेळाला दोन लाख रुपयांचे तर प्रशिक्षक वर्गातील प्रत्येक व्यक्तीला एक लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले.









