वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या सुरू असलेल्या पुरुषांच्या प्रो लीग हॉकी स्पर्धेत शुक्रवारी येथील कलिंगा स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या सामन्यात भारतीय हॉकी संघाने आक्रमक खेळाच्या जोरावर न्यूझीलंडचा 7-4 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला. या सामन्यात सुरुवातीला भारतीय संघ 1-3 असा पिछाडीवर होता.
या स्पर्धेतील 28 ऑक्टोबर रोजी झालेल्या पहिल्या टप्प्यातील सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 4-3 अशा गोलफरकाने निसटता पराभव केला होता. या पराभवामुळे शुक्रवारच्या सामन्यावेळी न्यूझीलंड संघावर सुरुवातीला दडपण आल्याचे जाणवले. दरम्यान, पहिल्या पंधरा मिनिटांच्या कालावधीत न्यूझीलंडने आपल्या डावपेचात बदल करून भारतावर 3 गोल नोंदविले. दरम्यान, भारताला या कालावधीत केवळ 1 गोल नोंदविता आला. सामन्यातील पुढील तीन पंधरा मिनिटांच्या कालावधीत भारताने प्रत्येकी 2 गोल नोंदवित न्यूझीलंडचे आव्हान संपुष्टात आणले.
या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार हरमनप्रित सिंगने 2 गोल केले. त्याने 7 व्या आणि 19 व्या मिनिटाला असे दोन गोल पेनल्टी कॉर्नरवर नोंदविले. भारतीय संघातील कार्ती सेलव्हमने 17 व्या आणि 38 व्या मिनिटाला असे 2 गोल केले. राजकुमार पालने 31 व्या मिनिटाला, सुखजित सिंगने 50 व्या मिनिटाला आणि जुगराज सिंगने 53 व्या मिनिटाला भारतातर्फे गोल नोंदविले. न्यूझीलंडतर्फे सायमन चाईल्डने दुसऱया मिनिटाला, सॅम लेनीने 9 व्या मिनिटाला, स्मिथ जॅकने 14 व्या मिनिटाला आणि निक वूड्सने 54 व्या मिनिटाला गोल नोंदविले. या संपूर्ण सामन्यामध्ये भारताला एकूण अकरा पेनल्टी कॉनर्स मिळाले. त्यापैकी तीन कॉर्नर्सवर गोल नोंदविले गेले. आता या स्पर्धेतील भारताचा दुसऱया टप्प्यातील सामना स्पेनबरोबर रविवारी येथे खेळविला जाणार आहे. भारतीय हॉकी संघाला 30 ऑक्टोबर रोजी झालेल्या पहिल्या सामन्यात स्पेनकडून 2-3 असा पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यानंतर भारतीय हॉकी संघाच्या कामगिरीबाबत प्रशिक्षक ग्रॅहॅम रिड यांनी समाधान व्यक्त केले. भारतीय संघाने बचावात्मक खेळापेक्षा आक्रमक धोरण अवलंबिल्याने हा सामना जिंकता आला, असेही रिड यांनी म्हटले आहे.









