वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक मिळविणाऱ्या हरमनप्रित सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय हॉकी संघाचे शनिवारी येथे आगमन झाले. दिल्लीच्या विमानतळावर हॉकीपटूंचे स्वागत करण्यासाठी हजारो शौकिन उपस्थित होते. हॉकी इंडियाचे पदाधिकारी तसेच हॉकी शौकिनांनी आपल्या हॉकीपटूंचे जल्लोषी स्वागत केले.
ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासामध्ये हॉकी या क्रीडा प्रकारात भारताने आतापर्यंत 13 पदकांची कमाई केली आहे. हा एक हॉकी प्रकारातील नवा विक्रम आहे. भारतीय हॉकी संघाने स्पेनचा 2-1 असा पराभव करुन कांस्यपदक मिळविले. टोकियो आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पाठोपाठ कांस्यपदके मिळविण्याचा पराक्रम भारतीय हॉकी संघाने केला आहे. भारतीय हॉकी संघातील गोलरक्षक पीआर श्रीजेश तसेच अमित रोहिदास, राजकुमार पाल, अभिषेक, सुखजीत सिंग आणि संजय हे रविवारी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या समारोप समारंभानंतर मायदेशी परतणार आहेत. 1972 नंतर पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने सलग दोन पदके मिळविण्याची ही पहिलीच वेळ आहे. कर्णधार हरमनप्रित सिंगने ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण 10 गोल नोंदवून पुरुष हॉकी या क्रीडा प्रकारात सर्वाधिक गोल करणारा तो हॉकीपटू ठरला आहे.









