वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2022-23 च्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या प्रो लिग हॉकी स्पर्धेत भारताच्या वरिष्ठ पुरुष हॉकी संघाला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेतील विविध ठिकाणी झालेल्या16 सामन्यात भारतीय हॉकी संघाने 30 गुण मिळवले.
प्रो लिग हॉकी स्पर्धेत 2020-21 च्या हंगामात भारतीय हॉकी संघाने पदार्पणातच चौथे स्थान मिळवले होते. त्यानंतर 2021-22 च्या प्रो लिग हंगामात भारतीय संघाने तिसरे स्थान मिळवले होते. 2022-23 च्या प्रो लिग हंगामात भारतीय हॉकी संघाने पहिल्या टप्प्यात 5 सामने जिंकले तर दोन सामने बरोबरीत राखले आणि एक सामना गमवला. भारतीय हॉकी संघाने या स्पर्धेत बलाढ्या अर्जेंटिना, बेल्जियम यांच्यावर शानदार विजय मिळवले होते तर नेदरलँड्स विरुद्ध दोन्ही सामन्यात भारताला पराभव पत्करावाल लागला हेता. 2022-23 च्या प्रो लिग हॉकी स्पर्धेचे जेतेपद नेदरलँड्सने पटकावताना 16 समन्यातून 35 गुण मिळवले. ब्रिटनचा संघ 32 गुणासह दुसऱ्या स्थानावर राहिला. बेल्जियमने 30 गुणासह तिसरे स्थान मिळवले. भारताने 30 गुणासह चौथे स्थान घेतले. या दोन्ही संघांनी समान गुण नोंदवले असले तरी भारताच्या तुलनेत बेल्जियमने अधिक सामने जिंकल्याने त्यांना तिसरे स्थान देण्यात आले.









