ऑस्ट्रेलियाचा 2-1 ने विजय : पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 ने यजमानांची विजयी आघाडी
वृत्तसंस्था/ पर्थ
भारतीय पुरुष हॉकी संघाला हॉकी कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियातील पर्थ हॉकी स्टेडियमवर बुधवारी झालेल्या या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा 2-1 असा पराभव केला. ऑस्ट्रेलियातर्फे जेरेमी हेवर्डने (44 व्या आणि 49 व्या मिनिटाला) दोन गोल केले. भारतासाठी जुगराज सिंगने (41 व्या मिनिटाला) एकमेव गोल केला. या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियन संघाने 3-0 अशी आघाडी घेत मालिकाही जिंकली आहे. भारतीय संघ शुक्रवारी 12 एप्रिल रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेतील चौथा सामना खेळणार आहे.
मागील दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर या तिसऱ्या सामन्यात हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. पण, पहिल्या 15 मिनिटांच्या खेळात ऑस्ट्रेलियन संघाचे वर्चस्व दिसून आले. खेळाच्या तिसऱ्याच मिनिटाला ऑस्ट्रेलियाने पेनल्टी कॉर्नर मिळवला पण भारतीय गोलरक्षक पीआर श्रीजेशच्या अप्रतिम प्रयत्नाने ऑस्ट्रेलियाचा गोल करण्याचा इरादा हाणून पाडला. मात्र, यानंतर भारतीय संघानेही पलटवार करत यजमान संघाच्या वर्तुळात मजल मारली मात्र संघाची निराशा झाली. खेळाचा पहिला क्वार्टर संपण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाने आणखी एक पेनल्टी कॉर्नर जिंकला पण भारतीय बचावफळी त्यांना भेदता आली नाही.
भारतीय संघाची आणखी एक हार
सामन्याचा दुसरा क्वार्टरही गोलशून्य राहिला. खेळाच्या या क्वार्टरमध्ये, भारतीय संघाने उत्कृष्ट बचावाचे प्रदर्शन केले आणि ऑस्ट्रेलियाच्या सर्व आक्रमणात्मक शॉट्सचा शानदार बचाव केला. खेळाचा तिसरा क्वार्टर खूपच रोमांचक झाला. सामन्याच्या 41 व्या मिनिटाला भारताच्या जुगराज सिंगने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत संघाला यश मिळवून दिले. पण भारतीय संघाचा आनंद फार काळ टिकला नाही. 44 व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियन संघाने शानदार गोल करत 1-1 अशी बरोबरी साधली. ऑस्ट्रेलियाकडून जेरेमी हेवर्डने गोल केला. चौथ्या सत्रात 49 व्या मिनिटाला जेरेमीने आणखी एक गोल ऑसी संघाला 2-1 असे आघाडीवर नेले. यानंतर शेवटपर्यंत भारतीय संघाने बरोबरी साधण्यासाठी प्रयत्न केले पण त्यांना यश आले नाही. अखेरीस ऑस्ट्रेलियाने हा सामना 2-1 असा जिंकला व मालिकेत भक्कम आघाडी देखील घेतली. या सामन्यात भारतीय संघाकडून काही चुका झाल्या, याचाच फटका त्यांना बसला.









