वृत्तसंस्था/ बेंगळूर
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या 2022-23 च्या प्रो लिग हॉकी स्पर्धेतील 26 मे पासून युरोपमध्ये सुरू होणाऱ्या लढतीसाठी भारतीय पुरुष हॉकी संघाने येथून सोमवारी रात्री उशिरा लंडनला प्रयाण केले.
या स्पर्धेतील पहिला टप्पा लंडनमध्ये 26 मे आणि 2 जून दरम्यान होणार आहे. या कालावधीत भारतीय पुरुष हॉकी संघाचे सामने विद्यमान ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या बेल्जियमबरोबर होणार आहेत. त्यानंतर भारतीय पुरुष हॉकी संघाचे सामने यजमान ब्रिटनबरोबर 27 मे आणि 3 जून रोजी खेळविले जाणार आहेत. हे सामने झाल्यानंतर भारतीय पुरुष हॉकी संघ इंडोव्हेनला शेवटच्या टप्प्यातील सामन्यासाठी प्रयाण करणार आहेत. भारत आणि यजमान नेदरलँड्स यांच्यातील सामने 7 आणि 10 जून रोजी त्यानंतर भारत आणि अर्जेंटिना यांच्यातील सामने 8 आणि 11 जून रोजी होणार आहेत.
2022-23 च्या प्रो लिग हॉकी स्पर्धेमध्ये आतापर्यंतच्या झालेल्या सामन्यानंतर भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. यापूर्वी झालेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी या बलाढ्या संघांना पराभूत केले होते. आता युरोपच्या दौऱ्यामध्ये होणाऱ्या बेल्जियम, ब्रिटन, नेदरलँड्स आणि अर्जेंटिना विरुद्धच्या सामन्यामध्ये भारतीय हॉकी संघ दर्जेदार कामगिरी करेल असा विश्वास भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रित सिंगने व्यक्त केला आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाचा या दौऱ्यातील पहिला सामना 26 मे रोजी बेल्जियमबरोबर भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7.10 वाजता सुरू होईल.









